पिंपरी : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे (Assembly Election) राजकीय वातावरण तापले आहे. ही निवडणूक भाजपने (BJP) आपल्या मोठ्या प्रतिष्ठेची केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यासाठी कंबर कसली आहे. म्हणूनच त्यांनी राज्यभरातील पक्षाचे सर्व बडे नेते हे या मतदारसंघात प्रचारात उतरवले आहेत. या पक्षाच्या चाळीस स्टार प्रचारकांत पिंपरी-चिंचवडकर उमा खापरे (भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा) आणि पुण्यातील योगेश टिळेकर (भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष) यांचा समावेश आहे.
निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर करावी लागते. त्यानुसार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुणसिंह यांनी कोल्हापूरच्या प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे नुकतीच (ता.२४) सादर केली. त्यात राज्यभरातील पक्षाचे मातब्बर नेते आहेत. यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, चित्रा वाघ, सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. त्यांच्या जोडीला स्थानिक नेत्यांचीही फौज आहे.
आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, सुरेश हाळवणकर, चंद्रशेखर बावनकुळे, धनजंय महाडिक, सुरेश खाडे, समरजीत घाडगे, महेश जाधव, अतुल भोसले, राहुल चिकोडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, विक्रांत पाटील, एजाज देशमुख, शौमिका महाडिक यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, डॉ.भागवत कराड हे सुद्धा प्रचाराला येणार आहेत. श्रीकांत भारतीय, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, रविंद्र चव्हाण, राज पुरोहित, किरीट सोमय्या, प्रसाद लाड, संदीप भंडारी, सुनील कर्जतकर यांचाही स्टार प्रचारकांत समावेश आहे.
महिला मोर्चामधून एकमेव स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केल्याबद्दल उमा खापरे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना आनंद व्यक्त केला. कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्यूमुळे ही पोटनिवडणूक होत आहे. तेथून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना महाविकास आघाडीने काँग्रेसकडून उमेदवारी दिली आहे. तर, भाजपचे उमेदवार सत्यजित कदम हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. या थेट लढतीत कदम हेच निवडून येतील, असा दावा खापरे यांनी केला आहे. खडकवासला आणि पंढरपूर-मंगळवेढ्याप्रमाणे कोल्हापूरमध्येही सहानुभूतीची लाट चालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महिलांचा मतदानाचा टक्का कसा वाढेल, त्यांचे मतदान हे पक्षाच्या उमेदवाराला कसे होईल, हे पाहणार असल्याचे खापरे यांनी सांगितले. कारण उत्तर प्रदेशात महिलांचे मोठे मतदान झाल्याचा फायदा पक्षाची तेथे पुन्हा सत्ता येण्यात झाला,याकडे त्यांनी लक्ष वेधले. केंद्राने महिलांसाठी आणलेल्या अनेक योजना आणि प्रदेशाध्यक्षांना कोल्हापूरातील महिलांकरिता केलेले काम हे महिलांपर्यंत पोचवून त्याचे रुपांतर त्यांची मते पक्षाला मिळविण्यात करणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.