BJP district president and MLA Dr Atul Bhosale faces a united NCP challenge in the Rethare Budruk Zilla Parishad group, making the home constituency battle politically crucial. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Atul Bhosale : भाजपचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसलेंना होमपीचवरच टफ फाईट; उंडाळकर-मोहितेंची एकत्रित फिल्डिंग

Satara Rethare Budruk ZP Election : रेठरे बुद्रुक जिल्हा परिषद गटात आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या होमपीचवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आव्हान उभे करत आहेत. काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

सरकारनामा ब्युरो

- अमोल जाधव

BJP News : भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांचे होमपीच समजल्या जाणाऱ्या रेठरे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हा गट एकतर्फी करण्याचा आमदार डॉ. भोसले यांचा मनसुबा असला, तरी येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर व कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी आमदार डॉ. भोसलेंच्या विरोधात आव्हान उभे केले आहे. त्यांना काँग्रेसनेही साथ दिल्यास निवडणुकीतील लढत अधिक लक्षवेधी होईल, असेच चित्र आहे.

यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले या पारंपरिक गटाचा हा बालेकिल्ला समजला जातो. अपवाद वगळल्यास आजपर्यंत या दोन्ही गटांच्या विचारांचे जिल्हा परिषद गटावर प्राबल्य राहिले आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या जिकडे, जिल्हा परिषद गटाची सत्ता तिकडे, असे आतापर्यंतचे समीकरण आहे; परंतु अलीकडील सुमारे 18 वर्षांत मोहिते व भोसलेंमधील राजकीय वितुष्ट कमी झाल्यावर या दोन्ही गटांच्या एकत्रित ताकदीवर निवडणूक लढली जात आहे. विरोधात काँग्रेस, अविनाश मोहिते व ॲड. उदयसिंह उंडाळकर या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शह दिला जात आहे.

यावेळच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. भोसलेंची विधानसभेतील विजयानंतर त्यांच्या होमपीचवर मिनी मंत्रालयाची पहिलीच निवडणूक आहे. त्यात त्यांचा एकतर्फी विजय खेचून आणण्याचा विचार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसने आघाडीचा पॅटर्न राबवत लढत दिल्यास आमदार डॉ. भोसलेंना एकतर्फी विजयासाठी प्रयत्न करावे लागतील, असे चित्र आहे.

जिल्हा परिषदेसाठी खुल्या महिला प्रवर्गाचे आरक्षण असून, रेठरे बुद्रुक गण खुल्या प्रवर्गासाठी व शेरे गण खुल्या महिला प्रवर्गाचे आरक्षण आहे. निवडणूक जाहीर होताच अनेक इच्छुकांनी दोन्हीकडील नेत्यांकडे उमेदवारीची मागणी केली आहे. आमदार डॉ. भोसले गटाकडून उमेदवारी ठरवताना पहिल्यांदाच गोपनीयता ठेवली आहे. विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या हालचाली आहेत.

त्यांच्यासोबत जाण्याचा काँग्रेसने अद्याप निर्णय घेतला नाही; परंतु काँग्रेसने मवाळ भूमिका पत्करून आघाडी पॅटर्नसाठी पुढे येण्याची शक्यता आहे. आमदार डॉ. भोसलेंच्या एकतर्फी विजयाच्या मनसुब्याला छेद देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या गटाच्या नेत्यांनी चंग बांधला आहे. त्यांना काँग्रेसची साथ कशी राहणार, हे महत्त्वाचे आहे. आमदार डॉ. भोसले यांची होमपीचवर करिष्मा करण्याची तयारी व विरोधी महाविकास आघाडीकडून दिली जाणारी झुंज निवडणुकीत ट्विस्ट आणणार का? हे पाहावे लागणार, हे नक्की.

इच्छुकांबाबत गोपनीयता...

आमदार डॉ. अतुल भोसले गटातून उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत गोपनीयता आहे. जिल्हा परिषदेसाठी दहा इच्छुकांनी मुलाखत दिली आहे. यातील उमेदवारांबाबत भोसलेंकडून सस्पेन्स ठेवला आहे. रेठरे बुद्रुक गणातून पैलवान धनंजय पाटील यांची, तर शेरे गणातून वर्षा निकम यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

विरोधी गटातून जिल्हा परिषदेसाठी रेठरे खुर्दच्या लोकनियुक्त सरपंच सुनीता साळुंखे, रेठरे बुद्रुक गणासाठी अभिजित सोमदे, तर शेरे गणातून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते शंकरराव निकम यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत त्यांच्या पत्नी संगीता निकम यांना उमेदवारी देऊन भोसले यांना शह दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT