Shambhuraj Desai-Smita Jadhav  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Politic's : महायुतीत वाद पेटला; भाजप उमेदवाराने शंभूराज देसाईंची भेट टाळली, पालकमंत्री तातडीने सांगली दौऱ्यावर रवाना...

Smita Jadhav Avoided meeting Shambhuraj Desai : पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातील बंडखोरीमुळे भाजप-शिवसेनेत तणाव वाढला आहे. पुणे पदवीधरच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी साताऱ्यात भाजप-राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटी घेतल्या, मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट टाळल्याची चर्चा आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 17 October : पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातील बंडखोरीवरून महायुतीमधील शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात वाद पेटला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपकडून जाऊनही शिवसेनेने उद्योगमंत्र्यांच्या ओएसडीला पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे, अमरावतीमध्ये शिवसेना उमेदवाराच्या विरोधात भाजपच्या बंडखोरांनी दंड थोपटले आहेत. त्याचे पडसाद साताऱ्यात उमटल्याचे दिसून येत आहेत. महायुतीच्या पुणे पदवीधरच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव ह्या सातारा दौऱ्यावर असताना त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. मात्र, शिवसेना नेते तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट टाळल्याचे दिसून येत आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या जागावाटप आणि त्यानंतर बंडखोरीमुळे महायुतीमध्ये विशेषतः शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात जोरदार अंतर्गत संघर्ष दिसून येत आहे. पाच जागांपैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला गेल्या असून प्रत्येकी एका जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बोळवण करण्यात आली आहे.

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ भाजपने स्वतःकडे ठेवले आहेत. मात्र, शिक्षक मतदारसंघावर शिवसेनेचा, तर पदवीधरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा होता. पण महायुतीत मोठा भाऊ असलेल्या भाजपने या दोन्ही जागांवर आपले उमेदवार उतरविले आहेत. मात्र, त्यावरून विशेषतः शिक्षक मतदारसंघावरून शिवसेनेचे नेते नाराज झाले आहेत. त्यातून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे आणि उद्योग मंत्री सामंत यांचे ओएसडी सचिन सानप यांनी बंडखोरी केली होती.

मंगेश चिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, सचिन सानप यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्या सानपांच्या पाठिशी शिवसेनेने आपली ताकद लावली आहे. खुद्द मंगेश चिवटे यांनीही पत्रकार परिषद घेत सानप यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेच्या भूमिकेबाबत भाष्य केले आहे.

एकीकडे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेने सानपांच्या पाठीशी ताकद उभी केलेली असताना पदवीधरमध्ये त्याचे पडसाद पडताना दिसत आहेत. पदवीधर निवडणुकीत महायुतीमध्ये साताऱ्यात धुसफूस दिसून येत आहे. महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव सातारा दौऱ्यावर असूनही शिवसेना नेते तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट टाळली आहे, असे वृत्त साम टीव्हीने दिले आहे

अखेर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे सांगलीच्या दिशेने रवाना झाले आहेत. डॉ. स्मिता जाधव यांच्या दौऱ्यात शंभूराज देसाई यांच्या भेटीचा उल्लेख करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष भेट टाळली गेली आहे. त्याची चर्चा सध्या सातारा जिल्ह्यात रंगली आहे.

शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्यानंतर आता पदवीधर मतदारसंघात ही महायुतीत धुसफुस सुरू झाली आहे. डॉ. स्मिता जाधव यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली. शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेणे टाळले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT