

Solapur, 17 October : पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेना नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ओएसडी राहिलेले सचिन सानप यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना शिवसेनेने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या मतदारसंघातून माघार घेतलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मंगेश चिवटे हे सानप यांच्या प्रचारात उतरले आहेत. त्यांनी ‘एक वेगळी अदृश्यशक्ती आम्ही सचिन सानप यांच्या मागे उभा करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे सूचक विधान केले आहे.
मंगेश चिवटे आणि सचिन सानप यांनी आज सोलापूरमध्ये संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत चिवटे बोलत होते. ते म्हणाले, सचिन सानप यांना पहिल्या क्रमांकाचे मतदान करा. मंगेश चिवटे म्हणजे सचिन सानप ही टॅग लाईन लक्षात ठेवा. त्यादृष्टीने शिक्षकांनी मतदानाला जावे. ते आमदार म्हणजे मंगेश चिवटे आमदार, हे लक्षात ठेवा. सचिन सानप हे माझे मोठे भाऊ आहेत.
कौस्तुभ गावडे माझ्या संपर्कात आहेत आणि सचिन भाऊंच्या प्रचाराचा झंझावात पाहून कौस्तुभ गावडे यांनी पुढच्या दोन दिवसांत माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको, असा टोलाही चिवटे यांनी गावडे यांनी लगावला.
जर मी नाराज असतो, तर सचिनभाऊंसाठी रात्रीचा दिवस केला नसता. एक वेगळी अदृश्यशक्ती आम्ही सचिन सानप यांच्या मागे उभा करण्याचा प्रयत्न करत आहोत, असा दावाही मंगेश चिवटे यांनी केला आहे.
सचिन सानप म्हणाले, मागील 16 वर्षे मी शिक्षक संघटनेत काम करतो आणि मी अपक्ष उमेदवारी अर्ज दखल केला. मंगेश चिवटे यांनी शिवसेनेकडून अर्ज दखल केला होता. एकनाथ शिंदे हे शिक्षकांचा अंडरकरंट ओळखला, इथे नाशिक पॅटर्न नाही तर शिक्षक पॅटर्न चालणार आहे.
ज्यांनी शिक्षकांना डावलण्याचा प्रयत्न केला, एवढ्या मोठ्या लोकांना एक साधा शिक्षक उमेदवार मिळाला नाही. माझ्या प्रचारासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. तीन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मला पाठिंबा देण्याचं जाहीर केले होते. शिक्षकांची भावना एकनाथ शिंदे यांनी ओळखली. खरं तर मंगेश चिवटे यांनी तयारी केली होती. मात्र शिंदेंच्या एका शब्दावर ते माझ्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे सानप यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, काही पक्षाचे आमदार अगीचे बंब ओतत आहेत, तो आटोक्यात आणण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. मी शिक्षक प्राध्यापक म्हणून निवडणूक लढतोय. मला पक्षप्रवेश करण्याची आवश्यकता नाही. शिवसेनेने माझ्या मागे एवढी ताकद उभी केली आहे, त्यामुळे पक्षप्रवेश करायचाच असेल तर तोही करेन.
पुणे पदवीधरबाबत पक्षाकडून आणखी सूचना आलेल्या नाहीत. शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच असला पाहिजे, बदल्यांच्या नावावर धमक्या देणारे संस्थाचालक चालणार नाहीत. 6 तारखेला फॉर्म भरण्याची मुदत संपली आणि 3 तारखेला कौस्तुभ गावडे यांना 30 वर्षे पूर्ण झाली. मात्र, आपल्याकडे 30 वर्षे अनुभव असणारे शिक्षक आहेत, असे सानप यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.