Dhairyasheel Mohite-Patil
Dhairyasheel Mohite-Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

धैर्यशिल मोहिते-पाटलांचे श्रीपूरमध्ये शक्तीप्रदर्शन; पण भाजप नगरसेवकाचीच दांडी!

सरकारनामा ब्यूरो

श्रीपूर (जि. सोलापूर) : महाळूंग-श्रीपूर नगरपंचायत निवडणुकीच्या (nagar panchyat election) निकालानंतर भाजपचे (bjp) जिल्हा सरचिटणीस धैर्यशिल मोहिते-पाटील आज (ता. २१ जानेवारी) समर्थक विजयी उमेदवारांच्या भेटीसाठी आले होते. मात्र, भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले एकमेव नगरसेवकच या वेळी गैरहजर होते, त्याची चर्चा रंगली होती. (BJP corporator absent in Dhairyasheel Mohite-Patil's tour)

दरम्यान, मोहिते-पाटील समर्थक विजयी उमेदवांसह धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी येथील राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोहिते पाटील यांनी दंड थोपटून या विजयाचा आनंद व्यक्त केला. त्यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

महाळूंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी सहा जागा राष्ट्रवादीच्या निवडून आल्या आहेत. तर मोहिते-पाटील समर्थक नऊ सदस्य विजयी झाले आहे. भाजपच्या चिन्हावर प्रकाश नवगिरे निवडून आले आहेत. आज येथे मोहिते पाटील आल्यामुळे नवगिरे यांची उपस्थिती अपेक्षित होती. पण तेच नेमके गैरहजर होते, त्यामुळे भाजपमधील दुहीची चर्चा पुन्हा रंगली होती. नवगिरे हे अकलूजच्या संस्थेत शिक्षक आहेत. त्यामुळे, ते आमचेच आहेत असे काहीजण सांगत आहेत. तर, निवडणूक काळात ज्यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला. तेच लोक नवगिरे आमचेच आहेत, असे सांगत आहेत, अशी चर्चा नवगिरे यांच्या निकटवर्तीयांमध्ये होताना दिसत आहे.

महाळूंग-श्रीपूर नगरपंचायत निवडणूकीत मोहिते-पाटील समर्थक भीमराव रेडे-पाटील गटाचे पाच तर नानासाहेब मुंडफने गटाचे चार असे हे 9 मोहिते-पाटील समर्थक उमेदवार आहेत. या उमेदवारांना आणि मतदारांना भेटण्यासाठी मोहिते-पाटील आज येथे आले होते. यावेळी रेडे पाटील आणि मुंडफने यांच्यासह त्यांच्या गटातून विजयी झालेले उमेदवार त्यांच्यासोबत होते. महाळूंग येथील यमाईदेवीचे दर्शन घेऊन त्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. या वेळी विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोहिते पाटील यांच्यासमवेत गुलालाची मुक्त उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. या दोन्ही गटाकडे सत्तेचा सोपान येण्याची सध्या परिस्थिती आहे. त्यासाठी मोहिते-पाटलांची मोठी मदत झाली आहे, याची जाणीव या दोन्ही गटातील मंडळींना आहे.

माेहिते पाटलांनी घरी बसायले सांगितले तर घरी बसू : रेडे-पाटील

मी मोहिते-पाटील समर्थक आहे. मी खूप मोठा कार्यकर्ता नाही पण, जनतेच्या मनात रूजलेला कार्यकर्ता आहे. मोहिते-पाटील ठरवतील त्यावर आमची वाटचाल असणार आहे. मोहिते-पाटील सत्तेत या म्हणले तर सत्तेत जाऊ. घरी बसा म्हणले तर घरी बसू, असे सहकारमहर्षी शंकराराव मोहिते-पाटील पुरस्कृत यमाई विकास पॅनेलचे भीमराव रेडे-पाटील यांनी सांगितले.

विजयदादा सांगतील तसे करू : मुंडफने

मी सहकारमहर्षी शंकराराव मोहिते पाटील पुरस्कृत पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेलो. मतदारांनी विकासाची भूमिका पटवून सांगून आम्ही घरोघर प्रचार केला. आमच्या दोन्ही गटाकडे नऊ सदस्य आहे. सत्तास्थापनेसाठी आमचे नेते विजयसिंह मोहिते पाटील सांगतील, त्यानुसार माझे चारही सदस्य वागतील, असे सहकारमहर्षी शंकराराव मोहिते-पाटील पुरस्कृत जगदंबा विकास पॅनेलचे नानासाहेब मुंडफने यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT