Solapur, 21 September : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. मागील निवडणुकीत दोन्ही जागा गमावणाऱ्या भारतीय जनता पक्षाने जोरदार शड्डू ठोकला आहे. सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आम्ही महायुती म्हणून लढू. पण, गरज पडली भाजप या दोन्ही जागा स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहे, असे सूचक विधान केले आहे, त्यामुळे विधान परिषदप्रमाणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघावर भाजप दावा सांगण्याची चिन्हे आहेत.
मागील निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड विजयी झाले होते, तर शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी बाजी मारली होती. त्या निवडणुकीत पदवीधरमध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यामुळे भाजप मागील निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चिन्हावर लढायची की नाही, पार्टी म्हणून लढायची की महायुती म्हणून लढायची, हा निर्णय मुख्यमंत्री आणि आमचे प्रदेशाध्यक्ष घेत असतात. आम्ही कार्यकर्ते म्हणून समोर येईल, त्या परिस्थितीनुसार निवडणूक लढायला सज्ज आहोत.
मागील निवडणुकीतील पराभवावरही जयकुमार गोरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, मागच्या वेळी पदवीधर आणि शिक्षक दोन्ही मतदार संघात भाजपचा पराभव झाला होता, हे मान्य करावं लागेल. राजकारणात फायदा-नुकसान होत असतं. पण, झालेलं नुकसान भरून काढणं, ही कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाबाबत भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मतदार नोंदणीवर विशेष भर दिला आहे. आम्ही या वेळी मतदार नोंदणीपासून सर्व तयारी मजबुतीने केली आहे, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
आगामी निवडणुकीत पुणे विभागातील या दोन्ही प्रतिष्ठेच्या जागा महायुती म्हणून लढल्यास विजय निश्चित असल्याचा दावा गोरे यांनी केला. त्याचवेळी, वेळ आली आणि पक्षाने स्वतंत्र लढायला सांगितलं तरी पक्ष दोन्ही निवडणुका ताकदीने लढायला आणि जिंकायला सज्ज आहे," असे सांगत त्यांनी स्वबळाचीही तयारी असल्याचे संकेत दिले आहेत.
सोलापूर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या विभागात शिक्षक आणि पदवीधर मतदारांमध्ये भाजपने आतापासूनच बैठकांचा धडाका लावला असून पालकमंत्र्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.