BJP Latest News
BJP Latest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

श्रीगोंद्यातील भाजप हर्षवर्धन पाटलांवर नाराज : विरोधकांना ताकत देत असल्याचा केला ठराव

संजय आ. काटे

Harshvardhan Patil Vs Babanrao Pachpute : माजी सहकारमंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ) यांच्या उपस्थितीत काही दिवसांपुर्वी नागवडे कारखान्यावर गळीत हंगामाची सुरुवात झाली. राजेंद्र नागवडे व त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे दोघेही काँग्रेस वाढीसाठी प्रयत्नशिल असून पुढच्या विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. नागवडे कुटूंब माजीमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कट्टर म्हणून ओळखले जातात. अर्थात हर्षवर्धन पाटील यांच्याशी त्यांची जवळीक पहिल्यापासून असल्याने कारखाना गळीत हंगाम प्रारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला आलेल्या पाटील यांच्याबद्दल स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी झाल्याची माहिती आहे.

याबद्दल एक बैठक घेत पाटील यांच्याबद्दल थेट पक्षश्रेष्ठींकडेच तक्रार केली जाणार असल्याचे समजते. नाराजीचा ठरावही केला गेला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यावर श्रीगोंदे तालुका भाजप पदाधिकारी नाराजा झाले आहेत. श्रीगोंद्यात भाजपाचे जेष्ठनेते बबनराव पाचपुते आमदार असतानाही पाटील येथे येवून विरोधकांना पाठबळ देत असल्याचा आरोप करीत येथील भाजपाने पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करीत पक्षश्रेष्ठींना पाठविण्यासाठी ठरावच केला आहे.

भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांच्यावर कार्यकर्त्यांची नाराजी आहे हे खरे आहे. त्याचे कारणही तसेच आहे. पक्षाचे नेते पाटील मध्यंतरी श्रीगोंद्यात आले होते. वास्तविक पाहता त्यांना भाजप व पाचपुते यांचे विरोधक असणाऱ्यांच्या आमंत्रणाला मान देत येथे येण्याचा निर्णय घेताना आमदार पाचपुते व पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्याशी संपर्क साधायला हवा होता. त्यातच पाटील यांनी काँग्रेसचे नागवडे यांचे कौतुक करताना त्यांना सगळेच पाठबळ दिले. 'कुठलीही फाईल अडली तरी मी आहे' असे आश्वासन देत एकप्रकारे विरोधकांना बळ देत, आमदारांच्या विरुध्दच भुमिका घेतल्याचे आमचे ठाम मत झाले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुध्दची नाराजी पक्षश्रेष्ठींना कळविण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान या नाराजीनाम्याचा ठराव आता पक्षश्रेष्ठींकडे पाठविला जाणार आहे. या सगळ्या घडामोडींना आमदार पाचपुते यांची संमती आहे की नाही हे समजले नसले तरी, पक्षांतर्गतच आमदार बबनराव पाचपुते विरुध्द हर्षवर्धन पाटील असा संघर्ष उभा राहू शकतो असे दिसते. या दोन नेत्यांमध्ये काँग्रेसने वाद लावलाय हे मात्र खरे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT