Ram Shinde and Rohit Pawar News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar News : "तुझ्याकडे बघतोच" रोहित पवारांच्या वक्तव्यावर भाजपची तक्रार

Ram Shinde News : आमदार राम शिंदे यांच्या विरोधात केले होते वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Rohit Pawar, Ram Shinde News : कर्जत-जामखेड एमआयडीसीला शासकीय मंजुरीसाठी सोमवारी (24 जुलै) मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन केले होते. या दरम्यान, त्यांनी असंसदीय भाषेत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांना "तुझ्या कडे बघतोच" असे धमकी देणारे वक्तव्य केल्याचा आरोप कर्जत तालुका भाजप कडून आज ( ता. 26) करण्यात आला. या प्रकरणी कर्जत पोलीस (Police) ठाण्यात तक्रार अर्ज करत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत कर्जत तालुका भाजप अध्यक्ष डॉ. सुनील गावडे-पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह घोषणाबाजी करत तक्रार अर्ज दाखल केला. यावेळी अंबादास पिसाळ, सचिन पोटरे, अशोक खेडकर, प्रवीण घुले, अल्लाउद्दीन काजी, काकासाहेब तापकीर, अभय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री शिंदे यांचा धमकीवजा एकेरी उल्लेख करुन अवमान केल्या प्रकरणी भाजप (BJP) पदाधिकार्यांनी निषेध व्यक्त केला. शिंदे यांच्याबाबत रोहित पवार यांनी विधानभवन येथे धमकीवजा एकेरी उल्लेख करुन "तुझ्याकडे बघतोच" अशी भाषा वापरुन जे त्यांच्या संस्काराला व घराण्याला न शोभणारे वक्तव्य केले.

प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जाणीवपुर्वक वक्तव्य करुन आपणाकडे लक्ष वेधण्यासाठी असे वक्तव्य केल्याचे सांगताना 29 मे 2023 रोजी चोंडी येथे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी असेच तुमच्याकडे बघुन घेतो, अशी भाषा वापरल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांना घरात घुसुन मारुन टाकु अशी धमकी दिली होती. त्याबाबतचा गुन्हा जामखेड पोलीस स्टेशन येथे दाखल आहे. असे असतानाच रोहित पवार यांनी पुन्हा अशीच धमकी दिली असल्याचा आरोप यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

वारंवार जाणीवपुर्वक वक्तव्य केले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. कर्जत व जामखेड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील रोहित पवार यांचा यांचा पराभव झाला. खर्डा ग्रामपंचायतीमध्येही त्यांना सत्ता गमवावी लागील. राज्यातील गेलेले सरकार आणि अजित पवार यांचे बंड व कर्जत तालुक्यातील नेत्यांनी सोडलेली साथ व अडीच वर्षातील त्यांच्या माध्यमातुन न झालेल्या विकासामुळे रोहित पवारांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. तरी आपण आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT