Shrikant Deshmukh
Shrikant Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हाध्यक्षांच्या कथित हनी ट्रॅपमुळे भाजपचा पाय खोलात

अभय दिवाणजी

सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात संघटनात्मक बांधणीची तयारी सुरु असताना सोलापूर जिल्हा भाजपच्या (BJP) गोटात कमालीची शांतता आहे. जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांच्या कथीत हनिट्रॅप प्रकरणाने पुरत्या घेरलेल्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह विविध पदाधिकाऱ्यांच्या जागाही रिक्त असल्याने भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षापुढे मोठी अडचण निर्माण होत आहे.

नात्यातील एका तरुणीने आपली फसवणूक करीत हनिट्रॅपमध्ये अडकाविण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद भाजप जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी ओशिवरा (मुंबई) पोलिस ठाण्यात दिली. त्या तरुणीवरील अन्यायाचा पाढाच सोशल मीडियावरील ऑडिओ क्लिपमधून समोर आला. दोघांमधील वादाचा बेडरुममधील व्हीडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आपली फसवणूक केल्याचा आरोप करीत देशमुखांविरोधात 'पिडीत' महिलेने राज्य महिला आयोगाकडे इ-मेलद्वारे तक्रार नोंदविली. जीवाला धोका असल्याचे तिने मेलमध्ये नमूद केले.

त्यानंतर पुण्यातील (pune) डेक्कन पोलिस (Police) ठाण्यात जाऊन 'तिने' देशमुख यांच्याविरोधात रितसर फिर्याद दिली. हा गुन्हा आता सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. देशमुख हे विवाहबाह्य संबंधाच्या अवतीभवती असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत देशमुखांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला. गेल्या तीन वर्षांपासून देशमुख हे भाजपच्या जिल्हाध्यक्षपदावर होते.

देशमुख मूळचे काँग्रेसचे कार्यकर्ते. (कै.) प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्यामुळे सांगोला तालुक्यातून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवडून गेले. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी जनसुराज्य पक्षाच्यावतीने विधानसभा निवडणूक लढविली. त्या काळात स्वतःवर गोळीबार करून मतदारांची सहानुभूती मिळण्याच्या प्रयत्नाबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत २०१९ची विधानसभेची निवडणूक लढविली. आता पुन्हा ते आमदारकीचे स्वप्न पाहत होते.

भाजपची स्थिती गंभीर

देशमुख यांचा राजीनामा त्यातच पक्ष संघटनेतील रिक्त पदे यामुळे पक्षाची स्थिती फारच गंभीर झाली आहे. फक्त जिल्हा भाजप युवा मोर्चा व अनुसुचित जाती-जमाती मोर्चा विभागाची पदे भरलेली आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात दोन-तीन तालुके वगळता जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणीची पदे रिक्त आहेत. पक्षाचे समर्थ बुथ अभियानाचे काम राज्यभर सुरु आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात या योजनेचा फज्जा उडालेला दिसतो. जिल्हाभरात मोठी ताकद असताना, त्यातच जिल्ह्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर असताना पक्षाकडून इतके कसे दुर्लक्ष? असा सवाल उपस्थित होत आहे.

जिल्हाध्यक्षाबरोबरच सोलापूर शहरातील युवा मोर्चा, आदिवासी मोर्चा, मच्छिमार सेल, माजी सैनिक सेल, तसेच जिल्हा कार्यकारिणी, विविध सहा मोर्चा आणि १९ सेलमधील काही अपवाद वगळता तळाच्या कार्यकत्यांच्या अद्यापही निवडी झाल्या नाहीत. या जागा भरताना सामान्य कार्यकर्त्यांचा विचार केला तर संघटनेस बळकटी होईल.

रिक्त पदांचा फटका बसणार

देशमुख यांच्या राजिनाम्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे. सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुका तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. सोलापूर जिल्ह्यात भाजपचे विधानसभेवर सर्वाधिक सहा तर विधान परिषदेवर एक आमदार तसेच दोन खासदार आहेत. तर बार्शीचे आमदार हे सहयोगी सदस्य आहेत. मावळत्या महापालिकेवर भाजपची प्रथमच सत्ता होती. आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक बांधणी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने सुपीक वातावरण असताना एकीकडे जिल्हाध्यक्षांच्या कथीत हनिट्रॅपमुळे नाचक्कीला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे पक्षातील विविध सेल व मोर्चांची पदे रिक्त आहेत. पक्षाचे कार्यक्रम व धोरणे जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी या पदाधिकाऱ्यांचा मोठा उपयोग होत असतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT