Amit Shah

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शहांनी केले भूमिपूजन मात्र, बंगळूरच्या घटनेचा उल्लेख नाही..

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे आज (ता.19 डिसेंबर) पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात ही पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन करण्यात आले. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन व डॅा. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar ) यांच्या पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले. यावेळी बोलतांना शहा यांनी कॅाग्रेसवर जोरदार टीका केली. मात्र, बंगळूरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणाचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही.

शहा म्हणाले, ज्यावेळी स्वराज्य आणि स्वधर्म हे शब्द उच्चारणे अवघड होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तरुणांना सदैव प्रेरणा देत राहील. शिवाजी महाराजांनी न्याय, समाजकल्याण, आत्मरक्षा, देशातील पहिले नौदल उभारण्याचे मोठे काम केले. महाराजांच्या पश्चातही त्यांच्या स्वराज्याचे कार्य त्यांच्या प्रेरणेने सुरू ठेवले. तसेच, आपल्या अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून त्यांनी एका उत्तम प्रशासनाचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे, असे मत शहा यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी शहांनी कॉंग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर अपमान, अन्याय, कटुता सहन केली. मात्र, त्यांनी संविधान तयार करताना कुठेही कटुता येऊ दिली नाही. बाबासाहेबांना त्यांच्या आयुष्यात व मृत्युनंतरही अपमानित करण्याची कॉंग्रेसने एकही संधी सोडली नाही. बाबासाहेब संसदेत कसे पोहचणार नाहीत यासाठी प्रयत्न केले गेले. त्यांना भारतरत्न पुरस्कारही बिगर कॉंग्रेस सरकार आल्यावरच दिले गेले. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधान दिवस साजरा करण्याची सुरुवात केली त्यावरही कॉंग्रेसने बहिष्कार टाकला होता, असा आरोप शहांनी केला.

दरम्यान, बंगळुरातील सदाशिवनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना काही समाजकंटकामार्फत करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रासह बेळगाव आदी परिसरात उमटले. या घटनेबाबत बोलतांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले होते की, बंगळुरातील घटना ही लहान-सहान आहे, त्यावरुन सरकारी वाहनांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे ही प्रवृत्ती चांगली नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

बोम्मईंच्या या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती व अन्य नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याप्रकरणी आज गृहमंत्री शहा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, त्यांनी याप्रकरणाचा साधा उल्लेखही केला नाही. आज पुण्यात त्याच्या हस्ते महापालिकेच्या विकास कामांचे उद्घाटन केले जाणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन व डॅा. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT