Dhananjay Mahadik, Chitra Wagh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महाडिकांविषयी भाजपमध्ये नाराजी; 'स्त्रीने शत्रू तुडवला' म्हणत चित्रा वाघही भडकल्या

भाजपचे नेते धनंजय महाडिक यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने वातावरण तापले आहे.

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : भाजपचे नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने वातावरण तापले आहे. त्यांच्या विरोधात गुरूवारी सर्वपक्षीय महिलांनी ताराराणी चौकात जोरदार आंदोलन केले. महाडिकांच्या वक्तव्याचा अनेकांनी निषेध केला असून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही घरचा आहेर दिला आहे.

कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर भाजपच्या (BJP) अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रा वाघ यांनी गुरूवारी रात्री ट्विट करत महाडिकांनी महिलांनी केलेल्या पराक्रमाची उदाहरणे दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी महाडिकांचा उल्लेख केला नसला तरी सध्या राज्यात त्यांच्याच वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे वाघ यांचा रोख महाडिकांकडेच असल्याचे स्पष्ट आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, राणी लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला. जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला. महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला. इतिहास सांगतो आमुचा स्त्रीने शत्रू तुडवला. महिलांचा सन्मान व्हायलाचं हवा. कुणीही मातृशक्तीचा अपमान होईल अशी वक्तव्य करू नयेत, असं म्हणत वाघ यांनी महाडिकांवर शरसंधान साधले आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) मैदानात उतरल्या आहेत. जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना मैदानात उतरवले आहे.

कोल्हापूरात राजकारण तापलं

महाडिकांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून गुरूवारी काळे ड्रेस आणि काळी साडी परिधान करून महिलांनी आंदोलन केले. ताराराणी चौकात हे आंदोलन करण्यात आले. एक रुपयांचा कढीपत्ता, मुन्ना झाले बेपत्ता, अशी घोषणा देऊन महिलांना चौक दणाणून सोडला. कोल्हापूर भाजपचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, धिक्कार असो, धिक्कार असो, महिलांचा अपमान करणाऱ्या मुन्नांचा धिक्कार असो, घोषणा महिलांनी दिल्या.

महाडिक काय म्हणाले?

काँग्रसचे लोक येतील आणि तुम्हाला सांगतील आम्ही एक महिला उभी केली आहे. ती बिचारी आहे. तुम्ही सगळ्या महिला आहात तर तिला मतदान करा. मला सांगा तुमचा पती एखादं प्लंबिंग काम करत असेल तुम्हाला ते जमणार आहे का? तुमचा पती इलेक्ट्रिशियन असेल तुम्हाला ते काम जमणार आहे का ? ज्याचं काम त्यानं करायचं असतं, असे वक्तव्य महाडिक यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT