Vilasrao Jagtap Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : जयंत पाटील-विश्वजित कदम यांच्यात 'सेटलमेंट'; सांगलीतील 'या' नेत्यांनं सगळंच सांगितलं

Jayant Patil, Vishwajeet Kadam and Vilasrao Jagtap : पक्षातील नेते मोठे न करता त्यांना जास्तीत-जास्त कसा त्रास देता येईल हेच या दोघांकडून केले जात आहे.

Anil Kadam

Sangli Political News : शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे राज्याचे नेते आहेत. तर माजी मंत्री विश्वजित कदम काँग्रेसमधील मातब्बर नेते आहेत. या दोन्ही नेत्यांना सांगलीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून सक्षम पर्याय देण्यात अपयश आले आहे. या दोन्ही नेत्यांच्या सेटलमेंटच्या राजकारणामुळे जिल्ह्यात आता तिसरे नेतृत्वच उभारू दिले जात नसल्याची टीका माजी आमदार व भाजप नेते विलासराव जगताप यांनी केली.

माजी आमदार जगताप (Vilasrao Jagtap) म्हणाले, जयंत पाटील व विश्वाजित कदम हे दोन्ही नेते त्यांच्या पक्षात राज्याचे नेतृत्व करतात. दोघेही मातब्बर आहेत. पण त्यांना त्यांच्या जिल्ह्यातच लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षातून सक्षम पर्याय देता आलेला नाही. ही त्यांची एकप्रकारे सेटलमेंटच असल्याची शोकांतिका आहे. पक्षातील नेते मोठे न करता त्यांना जास्तीत-जास्त कसा त्रास देता येईल हेच या दोघांकडून केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात त्यांच्याशिवाय तिसरा पर्याय उभा राहिलेला नाही.

जयंतरावांनी (Jayant Patil) केवळ स्वतःच्या मुलासाठी सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सर्व्हे केला. परंतु दोन्हीकडे डाळ शिजत नसल्याचे लक्षात येताच निवडणुकीतून माघार घेतली. प्रसंगी या दोघांनी विरोधी पक्षातील उमेदवार, नेत्यांशी हातमिळवणी केली. परंतु स्वत:च्या पक्षात कुणालाही मोठे होऊ दिले नाही. त्यांच्या या सेटलमेंटच्या राजकारणामुळे जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाल्याची टीकाही जगतापांनी केली.

संजयकाका पाटलांवरही टीका

भाजपने सांगली लोकसभा मतदारसंघात खासदार संजय पाटील (Sanjaykaka Patil) यांची उमेदवारी लादली आहे. सर्व्हे , पक्ष निरीक्षकांचा अहवाल नकारात्मक असताना, अनेक नेत्यांच्या त्यांना विरोध असताना पुन्हा त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पक्षात अनेक नेते नाराज आहेत. विरोधकांचा उमेदवार ठरला की या नेत्यांची बैठक होणार आहे. खासदार पाटलांना आमचा विरोध असणार आहे. आता कोणाला पाठिंबा द्यायचा हे बैठकीतच ठरणार आहे. पाटलांनी रांजणी ड्रायपोर्ट, कवलापूर विमानतळ यासह मतदारसंघातील अन्य ठिकाणची कामे दहा वर्षांत केली नाहीत, असा आरोपही जगतापांनी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटलांवर केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT