मलकापूरमध्ये भाजपची मोठी राजकीय खेळी — आमदार डॉ. अतुल भोसले यांनी ४२ वर्षे परस्परविरोधात असलेले मनोहर शिंदे आणि अशोकराव थोरात यांना एका व्यासपीठावर आणून भाजपची समीकरणे अधिक मजबूत केली.
भाजपमध्ये मोठे स्थलांतर — चव्हाण समर्थक, माजी नगरसेवक आणि अनेक गटातील नेत्यांना भाजपमध्ये घेऊन कऱ्हाड–मलकापूरमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भोसले यांनी मोर्चेबांधणी केली आहे.
इच्छुकांची संख्या तिपटीने वाढली — कऱ्हाड आणि मलकापूरमध्ये नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी प्रचंड इच्छुक वाढल्याने भाजपमध्ये नाराजी व संभाव्य बंडाचे संकेत दिसत आहेत.
Karad, 15 November : सध्या सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेची सत्ता हाती घेण्यासाठी भाजपचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी फिल्डिंग लावली आहे. त्यासाठी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना भाजपमध्ये घेतले. तसेच, ज्येष्ठ नेते अशोकराव थोरात हेही त्यांच्यासाेबत आहेत. त्या दोन्ही नेत्यांभोवतीच कालपर्यंत मलकापूरचे राजकारण फिरत होते.
शिंदे आणि थोरात यांना पालिका निवडणुकीच्या तोंडावर एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया आमदार डॉ. अतुल भोसले (Atul Bhosale) यांनी साधली. तब्बल ४२ वर्षांनंतर मलकापूरचे हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले. त्याचीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मलकापूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे झालेले एकत्रीकरण भाजपसाठी भविष्यात बेरजेचे राजकारण ठरू शकते.
मलकापूरला (Malkapur) सुरुवातीला तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत होती. त्यावेळी त्याचे सरपंच म्हणून शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी काम पाहिले आहे. त्यांच्याविरोधात माजी आमदार (कै.) भास्करराव शिंदे यांनी काम केले. सुमारे १९८३ पासून थोरात हे शिंदेंच्या विरोधात कार्यरत होते. त्यानंतर १९९५ मध्ये माजी आमदार (कै.) शिंदे यांचे पुत्र मनोहर शिंदे हे थोरात यांच्या विरोधात लढले. त्यावेळी त्यांचा पराभव झाला. मात्र, त्या पराभवाने खचून न जाता त्यांनी पुन्हा २००२ मध्ये जिल्हा परिषेद निवडणूक थोरात यांच्याविरोधात लढवली. त्यावेळीही त्यांचा पराभव झाला.
त्यानंतर २००५ मध्ये कऱ्हाडचे ज्येष्ठ नेते (कै.) पी. डी. पाटील यांनी शिंदे यांना सहकार्य केल्यामुळे तेथे त्यांची सत्ता आली. त्यानंतर त्यांनी मात्र मागे वळून पाहिलेच नाही. मलकापूरच्या लोकसंख्येत २००५ नंतर वाढ झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्यातून शिंदे यांनी २००८ मध्ये ग्रामपंचायतीची नगरपंचायत केली. त्यादरम्यान थोरात यांचा गट हा शिंदे यांच्याविरोधात होता. त्यानंतर शिंदे यांच्या काळातच नगरपंचायतीची नगरपालिका झाली. सन १९८३ ते २०२५ दरम्यानच्या ४२ वर्षांच्या काळात शिंदे आणि थोरात हे एकमेकांविरोधात होते.
विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून भाजपचे डॉ. अतुल भोसले कऱ्हाड दक्षिणचे आमदार झाले. तेव्हापासून तालुक्यातील राजकीय समीकरणे बदली आहेत. निवडणुकीनंतर विकासासाठी धडपडणाऱ्या इतर पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. पहिल्या टप्प्यात कऱ्हाड, मलकापूरमधील चव्हाण समर्थकांना भाजपच्या प्रवाहात सामील करण्याचा श्रीगणेशा केला.
पहिल्यांदा माजी उपनगराध्यक्ष शिंदे यांचे कट्टर राजेंद्र यादव यांना त्यांच्या सहकाऱ्यांसोबत भाजपमध्ये घेतले. त्यानंतर चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीच्या माजी नगरसेवक, तसेच यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांच्या माजी नगरसेवकांना भाजपमध्ये घेतले. त्यामुळे कऱ्हाड, मलकापूरचे वातावरण ढवळून निघाले. नुकतेच त्यांनी चव्हाण यांचे कट्टर समर्थक मनोहर शिंदे यांनाच भाजपमध्ये घेतले. त्यामुळे भाजपने कऱ्हाड, मलकापूर पालिका निवडणुकांची धामधूम सुरू असतानाही केलेली ही खेळी पक्षासाठी महत्त्वाची मानली जाते.
मलकापूरचे राजकारण मनोहर शिंदे-अशोकराव थोरात या नेत्यांभोवतीच आजपर्यंत फिरत होते. त्या दोन्ही नेत्यांनी तब्बल ४२ वर्षे एकमेकांच्या विरोधात काम केले. पालिका निवडणुकीच्या तोंडावर मलकापूरच्या या दिग्गज नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्याची किमया आमदार डॉ. भोसले यांनी करून नव्या राजकीय पर्वाची सुरुवात केली. तब्बल ४२ वर्षांनंतर हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले.
इच्छुकांची वाढती संख्या ठरणार डोकेदुखी
आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कऱ्हाड, मलकापूरला भाजपच्या कमळाची एकहाती सत्ता यावी, यादृष्टीने नियोजन केले आहे. त्याअंतर्गत त्यांनी अनेकांना नव्याने भाजपमध्ये घेतले आहे. त्यामुळे अगोदरपासून भाजपचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला आहे. त्यातच भाजपमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेकांनी त्यासाठी मुलाखतीही दिल्या आहेत.
कऱ्हाडला भाजपकडून नगरसेवक पदासाठी १०० हून अधिक जणांनी, तर नगराध्यक्षपदासाठी १७ जणांनी मुलाखती दिल्या. मलकापूरला नगरसेवकपदासाठी १३३ जणांनी मुलाखती दिल्या. त्यामुळे इच्छुकांची संख्या तिप्पट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यास नाराजांना दुसरा पर्याय निवडण्याचा मार्ग आहे, अशी सद्यःस्थिती आहे. त्यामुळे जुन्या-नव्यांचा मेळ घालण्याचे आव्हान आमदार डॉ. भोसले यांच्यापुढे आहे.
1️⃣ मलकापूरमध्ये सर्वात मोठी राजकीय घडामोड कोणती झाली?
४२ वर्षे विरोधात असलेले शिंदे–थोरात एकाच व्यासपीठावर आले.
2️⃣ हे दोन्ही नेते कसे एकत्र आले?
आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या रणनीतीमुळे ते भाजपकडे आकर्षित झाले.
3️⃣ भाजपमध्ये इच्छुकांची संख्या का वाढली आहे?
अनेक दिग्गजांचे प्रवेश आणि वाढलेले राजकीय समीकरण पाहून अधिक उमेदवार पुढे येत आहेत.
4️⃣ याचा भाजपला कोणता धोका आहे?
उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांमध्ये नाराजी व बंडाची शक्यता निर्माण होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.