<div class="paragraphs"><p>Ajit Pawar-Jayakumar Gore</p></div>

Ajit Pawar-Jayakumar Gore

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

भाजपचे आमदार जयकुमार गोरे म्हणतात, ‘मी अजितदादांचा फॅन’

मिलिंद संगई

बारामती : आमची राजकीय भूमिका काहीही असो पण मी अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचा फॅन आहे. त्यांची कार्यशैली, धाडस, धडाडी यांचा विचार करता मी त्यांचा चाहता आहे, हे जाहीरपणे सांगायला मला संकोच वाटत नाही, अशा शब्दांत भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (MLA Jayakumar Gore) यांनी रविवारी (ता. २ जानेवारी) बारामतीत अजितदादांवर स्तुतीसुमने उधळली. (BJP MLA Jayakumar Gore says, 'I am a fan of Ajit Pawar')

विशेष म्हणजे अजित पवारांच्या अनुपस्थितीत आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासमोर अगदी सहजतेने जयकुमार गोरे यांनी मोकळेपणाने ही कबुली दिल्याने आता नवीन राजकीय समीकरणे उदयास येतात का, याची चर्चा सुरु झाली आहे. येथील डॉ. आशिष जळक व डॉ. प्रियांका जळक यांच्या चैतन्य मातृत्व योजनेचे उद्‌घाटन अजित पवार यांनी केले. मात्र, वेळेपूर्वी तासभर येत उदघाटन उरकून अजित पवार निघून गेले होते.

आमदार जयकुमार गोरे आणि दत्तात्रेय भरणे हे चार वाजता कार्यक्रमस्थळी पोचले आणि आयोजकांनी त्यांनाही व्यासपीठावर येत बोलण्याचा आग्रह केला. जयकुमार गोरे यांनी अजितदादांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली. राजकीय मते वेगळी असली तरी मी अजितदादांचा फॅन असल्याची कबुली देत मला हे जाहीरपणे कबूल करण्यास फार काही वाटत नाही, अशीही पुस्ती त्यांनी जोडली. दादांकडे निर्णय घेण्याची धडाडी व धाडस आहे, ते स्पष्टवक्ते आहेत, त्यामुळे राजकारणापलीकडे जाऊन मी त्यांचा फॅन आहे, असेही आमदार गोरे म्हणाले.

हाच धागा पकडत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गोरे यांना लागलीच राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर देऊन टाकली. थेट ऑफर दिलेली नसली तरी तुमचा विचार असेल तर आम्हीही त्याला प्रतिसाद देऊ, असेही ते म्हणाले. बारामतीकरांनी हात दिला, तर काहीही होऊ शकतो आणि गोरे यांच्याकडे पाहत भरणे म्हणाले, ‘‘चुकतो तोच माणूस असतो, तुम्ही हाडाचे कार्यकर्ते आहात. तुम्ही येणाऱ्या काळात वेगळा विचार करा, त्याला चांगला विचार, असे भरणे यांनी शब्द वापरले.

बारामतीत झालेल्या या राजकीय धुरळ्याने माण-खटावमधील राजकीय समीकरणे पुन्हा बदलतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT