Ram Shinde News
Ram Shinde News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ram Shinde Latest News : राम शिंदेंनी वाढवले विखेंचे टेन्शन; फडणवीसांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी व्यक्त केली लोकसभा लढवण्याची इच्छा

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News : राजकारणात पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यावर दोन पावले मागे यावे लागते. मात्र, भविष्यात दोन पावले पुढे जाईन. भाजपमध्ये निष्ठावंतांना नेहमीच न्याय मिळतो. विधान परिषदेवर पाठवून पक्षाने माझे पुनर्वसन केले. पक्षाबद्दल कोणतीही नाराजी नसून, लोकसभा निवडणूक लढविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे, असे भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी म्हटले आहे.

शिंदे आज (ता. २७) शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की लोकसभा निवडणूक लढविण्याची महत्त्वाकांक्षा कायम आहे. यामुळे खासदार सुजय विखे यांचे टेन्शन वाढले असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यानंतर राम शिंदे यांनी लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली.

तसेच यावेळी शिंदे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर जयंती ही राज्य शासनाच्या वतीने साजरी केली जात आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, इंदूर (मध्य प्रदेश) येथील होळकर घराण्याचे वंशज यशवंतराव राजे (तृतीय), पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्याने उन्हापासून संरक्षणासाठी मंडप, पिण्याचे पाणी, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. चौंडी येथेच मुख्य जयंती सोहळा साजरा व्हावा. गावचा नागरिक म्हणून आपण या सोहळ्याला राजकीय मतभेद विसरून स्वागतासाठी सज्ज आहोत.

कर्जत-जामखेड इंटिग्रेट फाउंडेशनमार्फत जयंती सोहळा एक दिवस अगोदर साजरा करणे योग्य नाही. आपल्याकडे अशा स्वरूपाची प्रथा नाही. एक दिवस अगोदर जयंती साजरी करणे म्हणजे श्रद्धेचा अवमान आहे. आमदार पवारांनी मुख्य सोहळ्यात सहभागी व्हावे. त्यांना एक दिवस अगोदर अभिषेक करायचा आहे, त्या अभिषेकालाही कोणताही आक्षेप नाही, असेही शिंदे म्हणाले.

कुकडीचे पाणी अहमदनगर जिल्ह्याला सोडण्यासाठी ९ मे रोजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी पाणी प्रश्‍नावर आंदोलन केल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली. हे आवर्तन २२ मे रोजी सोडण्यात आले आहे. ही माहिती मंत्री पाटील यांनी देण्याऐवजी पवार देतात. मात्र, हे आवर्तन आमदार बेनके यांच्यामुळे उशिरा सुटले, हे सांगायला पवार विसरले. कालवा समितीच्या बैठकीचा फोटो प्रसिद्धीला देताना आपला फोटो कापला. समितीच्या निर्णयानुसार आवर्तन सोडले जाते, तरीही श्रेय लाटण्याचा प्रयत्न ते करतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT