Sachin Kalyanshetti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टींनी धमकी दिली : सोलापुरातील डॉक्टरांचा आरोप

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दोनच दिवसांपूर्वी सोलापूर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे

विश्वभूषण लिमये

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे (bjp) अक्कलकोटचे आमदार आणि पक्षाचे नवनियुक्त सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी व्हॉट्स ॲप कॉलद्वारे अरेरावी करत धमकी दिल्याचा आरोप सोलापुरातील अस्थिरोग तज्ज्ञ आणि सोलापूर (Solapur) विचार मंचचे सदस्य डॉ. संदीप आडके यांनी केला आहे. या संदर्भात डॉ. आडके यांनी पोलिस महासंचालकांसह भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे ई-मेलद्वारे तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मात्र डॉ. संदीप आडके यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. (BJP MLA Sachin Kalyanshetti threatened: Allegation of doctors in Solapur)

अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. आडके हे सोलापूरची विमान सेवा चालू व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. वेगवेगळ्या पातळीवरून ते यासाठी प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून अधिवेशन सुरू होण्याआधी जिल्ह्यातील सर्व आमदारांना विमान सेवेचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करण्याची विनंती त्यांनी केली होती. याच मुद्द्यावरून आमदार कल्याणशेट्टी यांनी डॉ. आडके यांना व्हॉट्स अप कॉलद्वारे अरेरावी करत धमकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या संदर्भात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी डॉ. आडके यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे ई-मेलद्वारे केली आहे. पक्षानेही त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना डॉ. आडके यांनी ई-मेल पाठवला आहे, अशी माहिती आडके यांनी दिली आहे.

दरम्यान, हे सर्व आरोप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी फेटाळून लावले आहेत. डॉ. संदीप आडके यांच्याशी माझा परिचय देखील नाही. त्यांनी मला एक मेसेज पाठवला होता, त्या संदर्भातच त्यांच्याशी बोलणं झालं आहे. मी त्यांना कोणतीही चुकीची भाषा वापरलेली नाही. मी खूप संयमाने काम करणारा व्यक्ती आहे, असे सांगत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी डॉ. आडके यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

या सर्व प्रकरणात सोलापूरचे पोलिस प्रशासन काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दोनच दिवसांपूर्वी सोलापूर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे, त्यातच हे धमकी प्रकरण नक्की कोणते वळण घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT