Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

‘मोहोळचा पुढचा आमदार भाजपचाच’ : महाडिकांच्या विजयानंतर पक्षनेत्याने केला दावा!

राजकुमार शहा

मोहोळ (जि. सोलापूर) : भाजपचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या राज्यसभा निवडणुकीतील विजयाने मोहोळ (Mohol) आणि पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील भीमा परिवाराच्या कार्यकर्त्यांना बूस्टर डोस मिळाला आहे. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणूक लढण्यासाठी भीमा परिवारासह भाजपमधील कार्यकर्त्यांना महाडिकांकडून ताकद मिळणार आहे. आगामी २०२४ मध्ये मोहोळमधून भाजपचा आमदार निवडणून येणार, असा विश्वास महाडिकांच्या विजयानंतर भाजपचे नेते संजय क्षीरसागर यांनी व्यक्त केला. (BJP MLA to be elected from Mohol in 2024: Sanjay Kshirsagar)

टाकळी सिकंदर येथील भीमा कारखान्याच्या माध्यमातून खासदार महाडिक यांच्या भीमा परिवाराची ताकद मोठी आहे. पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यात त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे. या संदर्भात भाजपचे नेते संजय क्षीरसागर म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रात खासदार महाडिक यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवारास दिलेली ताकद पक्षवाढीसाठी महत्वाची ठरणार असल्याचा विश्वास पक्षश्रेष्ठींना होताच. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाने त्यांना निवडून आणले. खासदार महाडिक यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रातील आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना नेतृत्व मिळाले आहे. खासदार महाडिक यांची आता केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागावी, अशी भावनाही क्षीरसागर यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, धनंजय महाडिक हे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, त्यामुळे त्यांना मोहोळ तालुक्यात प्रचार करता आला नाही. मात्र, २०२४ मध्ये मोहोळमधून भाजपचा आमदार निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असा विश्वासही संजय क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

खासदार महाडिक यांच्या निवडीने राज्यातील साखर कारखान्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक साखर कारखाने आजारी असल्याने ते बंद आहेत. मात्र, खासदार महाडिक हे त्यावर विचार करून केंद्र सरकारच्या माध्यमातून सकारात्मक मार्ग काढतील, अशी आशा साखर कारखानदारांना वाटते. गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत महाडिक यांनी अगदी थोडेसे लक्ष घातले तर निम्मी सत्ता हस्तगत करण्यात यश आले होते. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ते कार्यकर्त्यांना ताकद देतील, अशी अपेक्षा क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत भीमा परिवारआपला करिश्मा दाखविण्याच्या तयारीत आहे. ग्रामीण भागातील तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडून ते सोडवून घ्यायचे, याचे मोठे कसब खासदार महाडिक यांच्याकडे आहे. याच त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना तीन वेळा संसदरत्न पुरस्कार देण्यात आला. महाडिक राज्यसभेचे खासदार असल्याने ते मोठा निधीही देऊ शकतात त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मोहोळच्या विकासासाठी त्यांचा हातभार लागेल, अशी आशा मोहोळवासीयांना लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT