Babanrao Shinde-Ranjit Singh Nimbalkar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Loksabha : भाजप खासदाराच्या विजयाची जबाबदारी घेतली राष्ट्रवादीच्या बबनदादांनी; दोन लाख मताधिक्क्याची ग्वाही

भारत नागणे

Pandharpur News : माढा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आगामी लोकसभा निवडणुकीत दोन लाख मतांनी विजयी करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे. निंबाळकर यांच्या विजयाची जबाबदारी आमदार शिंदे यांनी स्वीकारल्याची खमंग चर्चा मतदारसंघात सुरू आहे. (BJP MP Ranjit Singh Nimbalkar will win by two lakh votes : Babanrao Shinde)

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे (baban Shinde) आणि भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर (ranjitsinha naik nimbalkar) यांच्यात चांगलेच राजकीय सूत जुळल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच त्यांनी निंबाळकरांना थेट दोन लाख मतांनी निवडून आणण्याची भाषा केली आहे.

खासदार निंबाळकर यांच्या हस्ते आणि आमदार शिंदे यांच्या उपस्थितीत माढा विधानसभा मतदारसंघातील श्रीपूर ते खंडाळी या रस्त्याचे लोकार्पण शनिवारी (ता. २९ जुलै) झाले. त्यात कार्यक्रमानंतर आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना ही ग्वाही दिली.

वास्तविक, खासदार निंबाळकर हे मागील निवडणुकीत आमदार शिंदे यांचे बंधू तथा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना पाडून विजयी झालेले आहेत. त्या निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांना एक लाखाचे मताधिक्क्य दिले होते. त्यावेळी आमदार शिंदे हे विरोधात होते.

गेल्या काही वर्षांपासून मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर यांच्यात अंतर पडत गेले आहे. त्यांच्यात सध्या खासदारकीच्या तिकिटासाठी तीव्र स्पर्धा दिसून येत आहे. दरम्यानच्या काळात माहिते पाटील यांचे राजकीय प्रतिस्पर्धी शिंदे यांचे निंबाळकर यांच्याशी राजकीय सूत जुळले आहे. दोन्ही शिंदे बंधू हे खासदार निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

मोहिते पाटील यांच्याशी जसे राजकीय मतभेद वाढत गेले तसे निंबाळकर यांनी शिंदे बंधूंसोबत सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. राज्यात नुकतेच अजित पवार गट भाजपसोबत गेल्याने ते नाते आणखी घट्ट झाले आहे. कारण दोन्ही शिंदे बंधू अजितदादांच्या गोटात सहभागी झाले आहेत. त्यातूनच आमदार बबनराव शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत निंबाळकर यांना विजयी करण्याची जबाबदारी घेऊन दोन लाखांचे मताधिक्क्य देण्याची ग्वाही दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT