Sharad Pawar and UdayanRaje

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

चर्चेला उधाण : खासदार उदयनराजे दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला

उदयनराजे यांनीच या भेटीचा फोटो ट्विट केला आहे.

सरकारनामा ब्युरो

सातारा : भाजपचे (BJP) राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (UdayanRaje Bhosle) यांनी बुधवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. उदयनराजे यांनीच या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. तसेच ही सदिच्छा भेट असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. पण मागील काही महिन्यांतील राजकीय घडामोडींनंतर झालेल्या या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त (Parliament Winter Session) शरद पवार यांच्यासह उदयनराजे व अन्य खासदार दिल्लीत मुक्कामी आहेत. उदयनराजे बुधवारी सकाळी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन शरद पवार यांच्या घरी दाखल झाले. यावेळी दोघांमध्ये काहीकाळ चर्चाही झाली. पवारांचा नुकताच वाढदिवस झाला आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. पण या भेटीतून आगामी काळात सातारा जिल्ह्यात वेगळी राजकीय समीकरणे तर उदयास येणार नाहीत ना, याचीच चर्चा रंगली आहे.

उदयनराजे हे लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये दाखल झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांना पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील सातारा लोकसभेचे खासदार झाले. याच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवारांची भरपावसातील प्रचारसभा चांगलीच गाजली. यावेळी त्यांनी उदयनराजेंवर टीका करताना मागील लोकसभेवेळी आपली चूक झाल्याचे सांगत मतदारांना चूक सुधारण्याचे आवाहनही केलं होतं.

उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडली असली तरी शरद पवार यांच्यावर असलेले प्रेम व जवळीक संपलेली नाही. मध्यंतरी शरद पवार आजारी असताना त्यांनी पुण्यात त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यामुळे शरद पवार आणि उदयनराजे यांचे वेगळे नाते निर्माण झाले आहे. पुढील काळात सातारा पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत असल्याने आजची भेट महत्वाची मानली जात आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी फलटणमधील कार्यक्रमात साताऱचा खासदार निंबाळकर यांच्या सारखा असावा असे वक्तव्य केले होते. यावरून उदयनराजे यांच्याविषयी भाजपमध्ये नाराजी असल्याचे चित्र तयार झाले होते. पण खासदार निंबाळकर यांनी मी माढा मतदारसंघातूनच लढणार असून साताऱ्यातून उदयनराजे हेच खासदारकी साठी योग्य आहेत, असे सांगत सारवासारव केली. तर उदयनराजे यांनीही गांभीर्याने घेतले नाही. पण त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT