Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली असतानाच पुन्हा एकदा भाजपच्या दुसऱ्या मोहऱ्यानं बंडाचे निशाण फडकवले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चंदगडमध्ये येत भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीतील संभाव्य उमेदवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार राजेश पाटील यांनी भाजप नेत्यांना इशारा दिला होता.
याला आठवडा न उलटताच भाजपच्या दुसऱ्या नेत्याने बंडाचे निशाण फडकवले आहे. चंदगड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती संग्रामसिंह कुपेकर यांनी दिली आहे.
शिवसेनेतून (Shiv Sena) संग्रामसिंह कुपेकर हे दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पक्षप्रवेश करून त्यांनी पक्षाच्या कार्याला सुरुवात केली होती. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून चंदगड विधानसभा मतदार संघातील खिंड लढवली होती. यंदाही विधानसभा निवडणुकीला ते इच्छुक आहेत. भाजपकडून शिवाजीराव पाटील हे देखील इच्छुक आहेत.
चंदगडमधील लढत ही मैत्रीपूर्ण करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर धडपड सुरू आहे. अशातच भाजपचे (BJP) प्रदेश कार्यकारणी सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. येत्या 24 ऑक्टोबरला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यासाठी उपस्थित राहण्याचे देखील आव्हान त्यांनी मतदारांना केला आहे.
चंदगडमधून विधानसभेसाठी महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून आमदार राजेश पाटील यांच्याकडे पाहिले जाते. तर भाजपचे (BJP) नेते शिवाजीराव पाटील यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी ठेवली आहे. त्यांची बंडखोरी निश्चित मानली जाते. महाविकास आघाडीकडून डॉ. नंदाताई बाभुळकर या संभाव्य उमेदवार समजल्या जातात. वरिष्ठ स्तरावरून ही निवडणूक एकाच एक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शिवाजीराव पाटील यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून आपला निशाणा वरिष्ठ नेत्यांवर लावला आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण या मतदार संघातून निवडणूक लढवायची असा ठाम निर्धार शिवाजीराव पाटील यांनी केला आहे. संग्राम सिंह कुपेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केल्यानंतर महायुतीमध्ये पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
मागील निवडणुकीत मला पस्तीस हजार मतदान पडलेले आहे. गेले 20 वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात माझा सहभाग आहे. नव्या पिढीने नेतृत्व करावं, त्यामुळे या निवडणुकीला सामोरे जाणारा असून येत्या 24 ऑक्टोबरला मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, अशी माहिती संग्रामसिंह कुपेकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.