Devendra Fadnavis-Eknath Shinde-Sunil Tatkare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli-Satara MLC : सांगली-साताऱ्याबाबत महायुतीचा मोठा निर्णय; फडणवीस, शिंदे, तटकरेंची एकत्रित बैठक

Devendra Fadnavis-Eknath Shinde-Sunil Tatkare Meeting : सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील मतभेद मिटल्याचे संकेत मिळाले असून वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेतृत्वाला एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Vijaykumar Dudhale

Satara, 15 June : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बैठकीनंतर हा निर्णय झाल्याची माहिती आहे. या तीनही नेत्यांनी स्थानिक नेतृत्वाला एकत्रित काम करण्याची सूचना दिल्याची सांगितले जात आहे.

या मतदारसंघात भाजपकडून धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांच्यात निवडणूक होत आहे. महायुतीमधील (Mahayuti) तीन पक्षांमध्ये सध्या एकमत नसल्याचे अनेक घटनांमधून दिसून येत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बोलावण्यात आलेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीकडे मित्रपक्ष असलेले शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पाठ फिरवली होती. महायुतीची बैठक असताना फक्त भाजपचेच मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित होते. त्यामुळे ती भाजपचीच बैठक ठरली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत भाजपच्या कार्यशैलीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली होती. निर्णयाचे अधिकार हे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना देण्यात आले होते. पण भाजपच्या पाठिंब्याबाबतचा निर्णय झाला नव्हता.

शिवसेनेचे नेते तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनीही उद्या शिवसेनेच्या सदस्यांची बैठक घेणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मतदानाला अवघे तीन दिवस उरले असताना महायुतीमधील तीनही पक्षांची तोंडे तीन दिशेला होती. त्यामुळे महायुतीमध्ये एकमत घडविणे आवश्यक होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात आज मुंबईत बैठक झाली. त्यातील चर्चेनुसार तीनही पक्षांनी एकत्रितपणे काम करण्याबाबत एकमत झाले. स्थानिक नेत्यांना त्याबाबतची सूचना देण्यात येणार आहे, त्यामुळे महायुतीमधील तीनही पक्षांचे एकत्र काम करण्याबाबत एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीमधील तीन वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकत्र काम करण्यावर एकमत झाले आहे. मात्र, या बैठकीला स्थानिक नेते कोणी होते. राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आणि शिवसेनेचे शंभूराज देसाई यांची उपस्थिती होती का, याची माहिती मिळू शकली नाही. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT