Satara Dcc Bank Election  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Dcc Bank Election : सातारा DCCच्या 10 पैकी 6 जागांवर भाजपचा, तर 5 जागांवर राष्ट्रवादीचा दावा; भाजपचा ‘प्लॅन बी’ही तयार...

Seat sharing of Mahayuti : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे. मात्र, भाजपला सहा राखीव जागा, तर राष्ट्रवादीला पाच जागा हव्या असल्याने जागा वाटपाचा तिढा कायम आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 10 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक महायुतीने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जागा वाटपावर अजूनही तोडगा निघू शकला नाही. घटनस्थापनेच्या मुहूर्तावर उद्या (रविवारी, ता. 11 ऑक्टोबर) जागा वाटपावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत जागा वाटपावर पडद्यामागे जोरात रस्सीखेच सुरू आहे. भाजपने राखीवमधील 10 जागांपैकी तब्बल 6 जागांवर दावा सांगताना प्लॅन बी तयार ठेवल्याची चर्चा आहे, तर राष्ट्रवादीलाही पाच जागा हव्या आहेत, त्यामुळे महायुतीची घोषणा झाली असली ती शेवटपर्यंत राहणार का, अशी चर्चा रंगली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 21 जागांची रणधुमाळी सुरू आहे. बॅंकेची निवडणूक महायुती म्हणून लढविण्याचा निर्णय घेतलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अजूनही जागा वाटपावर तोडगा निघू शकलेला नाही. गेल्या शुक्रवारी एका हॉटेलमध्ये जागा वाटपावर महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. मात्र, त्यात जागा वाटपावर तोडगा निघू शकलेला नाही.

घटस्थापनेला म्हणजे रविवारी जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला महायुतीच्या नेत्यांनी ठरविला आहे. त्यानुसार सहकारी सोसायटी मतदारसंघातील ११ जागा त्या त्या तालुक्यातील नेत्यांनी आपापल्या बळावर लढायच्या आहेत. पण उर्वरीत १० जागांचे वाटप हे ठरावाच्या संख्येनुसार होणार आहे. त्यामुळे कोणाकडे किती ठराव आहेत, याची उत्सुकता वाढली आहे.

भारतीय जनता पक्षाने राखीव १० पैकी ६ जागांवर दावा केला आहे. बिनविरोध निवडणुकीतील सहा जागा पदरात पाडून घ्यायच्या आणि सोसायटील मतदारसंघातील पाच ते सहा जागा जिंकायच्या. त्याद्वारे बॅंकेचा अध्यक्ष भाजपचा करायचा, असा भाजपचा डाव आहे.

एकीकडे भाजपने शिवसेना-राष्ट्रवादीबरोबर बोलणी सुरू ठेवताना प्लॅन बीही तयार ठेवल्याची माहिती आहे. जागा वाटपाची चर्चा फिस्कटली तर ऐनवेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पुढे आणण्याची रणनीती भाजपने आखल्याचे सांगितले जात आहे. महायुतीमध्ये समन्वयकाची भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि गोरेंचे निकटवर्तीय आमदार धैर्यशील कदम यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे गोरे जिल्हा बॅंकांच्या बैठकांपासून दूर असल्याचे दर्शवित असले तरी प्रत्येक बैठकांमधील खडानखडा माहिती त्यांच्यापर्यंत पोचत आहे, त्यामुळे भाजपने जिल्हा बॅंकेवर पक्षाचा अध्यक्ष बसविण्याची फुल्ल तयारी केली आहे.

भाजपचा प्लॅन उधळून लावण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसने आखल्याचे दिसून येत आहे. कारण पक्षाने १० पैकी ५ जागांवर दावा सांगितला आहे, त्यासाठी त्यांच्याकडून ठरावाचा आकडा सांगितला जात आहे. खासदार तथा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे.

मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांनी दहा पैकी पाच जागा आणि सहकारी सोसायटीतील जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष करायचा असा पाटील बंधूंचा प्लॅन आहे. अजितदादांच्या विचाराचा अध्यक्ष व्हावा, यासाठी राष्ट्रवादीचा अध्यक्ष बसविण्याची तयारी या दोघांनी केली आहे.

शिवसेनेने तीन जागा मागितल्या आहेत. जागा दहा आणि मागणी महायुतीमधील १४ जागांची, त्यामुळे माघार कोण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रामराजे नाईक निंबाळकर, शंभूराज देसाई, शेखर गोरे यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा पक्षाकडून व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT