

Mangalvedha, 10 October : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या आठ महिन्यांत तालुकाध्यपदाची भाकरी फिरवली. जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख आणि कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी पक्षाच्या पुनर्रचनेत मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी सिद्धेश्वर रणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ही एकमेव निवड आहे, त्यामुळे त्याची चर्चा रंगली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा तालुका म्हणून मंगळवेढ्याची ओळख आहे. मात्र, अवघ्या आठ महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पक्षबांधणी करताना जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांनी अनेकांच्या निवडी करून त्यांना नियुक्तीचे पत्रे दिली होती.
दुष्काळी भागात पाणी प्रश्नासाठी दिलेला लढा पक्षवाढीसाठी फायदेशीर ठरेल, असा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी पाणी संघर्ष समितीचे प्रमुख पांडुरंग चौगुले यांच्यावर सोपवली होती. मात्र, अवघ्या ८ महिन्यांनंतर पक्षाने बदल करत भाकरी फिरवत सिद्धेश्वर रणे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग मंगळवेढा तालुक्यामध्ये होता. पण अलीकडच्या काळात या पक्षाची तालुक्यात मोठी वाताहत झाली आहे. अनेक सहकाऱ्यांनी इतर पक्षांचा आधार घेतला आहे. दुष्काळी परिस्थितीचा विचार करता सिद्धेश्वर रणे या अनुभवी नेत्याकडे पक्षाने तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भोसे जिल्हा परिषद गटातून सिद्धेश्वर रणे यांनी आपला उमेदवारी अर्जदेखील भरला होता. ऊस बागायती पट्ट्यातील प्रश्नांबरोबर त्यांना आता दुष्काळी प्रश्नांवर प्रभावीपणे काम करावे लागत आहे.
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये मंगळवेढा तालुक्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेसने आतापर्यंत सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून तालुक्यातील रखडलेले प्रश्न ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण, काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पूर्णपणे कोमात होता. रणे यांच्या निवडीनंतर पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतात का, हे पाहावे लागणार आहे.
जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार
दुष्काळी परिस्थिती आणि पक्ष अडचणीच्या काळात माझ्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असून शिवाय जनतेच्या प्रश्नावर लढा उभारणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी सिद्धेश्वर रणे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.