Karad Nagar Parishad Election Result Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Nagar Parishad : कऱ्हाडमध्ये पवारांच्या शिलेदाराकडून भाजप आमदाराला धोबीपछाड; नगराध्यक्षाच्या निवडणुकीत राजेंद्रसिंह यादवांची बाजी

Nagar Parishad Election Result : कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीत यशवंत विकास आघाडी आणि माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीकडून राजेंद्रसिंह यादव यांनी विजय मिळवून नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad, 21 December : कऱ्हाड (जि.सातारा) येथील नगरपालिकेसाठी चुरशीने झालेल्या मतदानामुळे नगराध्यक्ष कोण होणार, याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत यशवंत विकास आघाडी आणि माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीकडून माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी विजय मिळवून नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले आहे.

भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांचे समर्थक नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर आणि कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून कऱ्हाडचा उल्लेख होतो. या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल नऊ वर्षांनंतर निवडणूक झाली, त्यामुळे ही निवडणुक रंगतदार झाली. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार उमेदवारांना चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराला अवघे पाचच दिवस मिळाले. त्यामुळे नेत्यांसह उमेदवारांनी पायाला भिंगरी लावून मतदारांपर्यत पोचण्याचा प्रयत्न केला.

कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीत भाजपचे नेते आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कमळाच्या चिन्हावर उमेदवार उभे करुन नगराध्यक्षपदासाठी विनायक पावसकर यांच्या पाठीमागे ताकद लावली होती. कॉंग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हाताच्या पंजावर उमेदवार उभे करुन नगराध्यक्षपदासाठी झाकीर पठाण यांना ताकद दिली होती.

माजी सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी आणि माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची यशवंत विकास आघाडी यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली. त्या दोन्ही आघाडीचे राजेंद्रसिंह यादव हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते.

शहरातील १५ ब प्रभागातील मतदान शनिवारी (ता. २० डिसेंंबर) झाले. त्यामुळे आज सर्व मतदानाची एकत्रीत मोजणी झाली. नगराध्यपदासाठी कोणाची वर्णी लागणार याची मोठी उत्सुकता कऱ्हाडकरांसह सातारा जिल्ह्यात सर्वांना लागून होती.

माजी सहकारमंत्री पाटील यांची लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र यादव यांनी बाजी मारली. त्यामुळे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर आणि कॉंग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर पठाण यांनी मात्र पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

निकालाआधीच दोन आठवडे केली नेमप्लेट

कऱ्हाड पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीतर्फे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव हे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते. आज रविवारी निकाल जाहीर होण्यापूर्वीच दोन आठवडे अगोदर यादव यांच्या समर्थकांनी त्यांच्या नावाची नगराध्यक्षपदाची नेमप्लेट तयार करुन ती काही काळ त्यांच्या कार्यालयात ठेवली होती. त्याचीच चर्चा कऱ्हाड शहरात जोरदार सुरु आहे, त्यावरही आज शिक्कामोर्तब झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT