BJP vs NCP battle intensifies as shifting alliances shake the NCP stronghold. Sunil Mane, Chitralekha mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rahimatpur Election : भाजपने समीकरण फिरवलं.. खासदार, मंत्र्यांनी ताकद देऊनही 'राष्ट्रवादीच्या' गडाला हादरे

Rahimatpur Election : शहरातील भाजप-राष्ट्रवादी लढत बदललेल्या समीकरणांमुळे हाय व्होल्टेज बनली असून माने कुटुंबातील राजकीय हालचाली, पक्षांतरे आणि मंत्र्यांच्या पाठिंब्यामुळे निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे.

सरकारनामा ब्यूरो

इम्रान शेख :

Rahimatpur News : रहीमतपुर येथील पालिकेच्‍या निवडणुकीच्‍या निमित्ताने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे. शहरातील सध्याची एकूण स्‍थिती पाहता, नगराध्‍यक्षपदासह येथील सर्वच प्रभागांतील लढती ‘हाय व्‍होल्‍टेज’ स्‍थितीत पोचत असल्‍याचे चित्र आहे. नेतृत्‍वांच्‍या रणनीतीला आता कार्यकर्त्यांची कशी साथ मिळते हे पाहणे महत्त्‍वाचे ठरणार आहे. या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे.

मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 13, काँग्रेसने तीन आणि शिवसेनेने एका जागेवर यश मिळवले होते. त्‍यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि चित्रलेखा माने-कदम यांचे गट एकत्र होते. त्‍यांनी पालिकेत बाजी मारली होती, तर नीलेश माने यांनी त्यांना टक्कर दिली होती; परंतु यावेळेस भारतीय जनता पक्षाच्‍या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम या नीलेश माने यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे, तर शिवसेना नेते वासुदेव माने हे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सुनील माने यांच्याबरोबर उभे असल्‍याने निवडणुकीत ऐनवेळी रंगत वाढली आहे. सुनील माने यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. माने यांना मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीनकाका पाटील यांनी ताकद दिली आहे.

शहरात उत्‍साह

शनिवारी सकाळी राष्ट्रवादी-शिवसेनेची पदयात्रा आणि संध्याकाळी भाजपचा प्रचार प्रारंभ यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता, या वेळीची निवडणूक ही नागरिक स्वतःच्या हातात घेत आहेत, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

प्रभागवार लढतींचा विचार करता प्रभाग एकमध्‍ये भाजपला नवा जोर चढला असून, राष्ट्रवादीकडून नवख्या चेहऱ्यांची एंट्री झाली आहे. या प्रभागात विक्रमसिंह माने आणि विकास तुपे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपची ताकद वाढली आहे. त्‍यांच्‍या पत्नी उमेदवार म्हणून मैदानात आहेत. राष्ट्रवादीकडून केतन माने आणि काजल घोलप हे नवखे उमेदवार उतरले आहेत. रोकडेश्वर गल्ली व बेघरवस्ती परिसरात भाजपची पकड मजबूत मानली जाते, मात्र राष्ट्रवादी- शिवसेना युतीचा फायदा राष्ट्रवादीला मिळू शकतो, अशी चर्चा आहे.

भाजपचे पारडे जड

माजी नगराध्‍यक्ष संपतराव माने यांचे चिरंजीव नीलेश माने यांचा प्रभाव राहिलेल्‍या प्रभाग दोनमध्‍ये भाजपचे पारडे जड दिसत असले, तरी त्‍यांना मागील निवडणुकीत टक्‍कर दिलेले राष्‍ट्रवादीचे (NCP) अभय माने यांनीही पुन्‍हा एकदा मोठे आव्‍हान निर्माण केले आहे. येथे भाजपचे नीलेश माने आणि भाग्यश्री शेरकर यांना राष्ट्रवादीकडून अभय माने व दीपाली शेरकर यांच्‍याकडून आव्‍हान देण्‍यात आले आहे. मागील निवडणुकीत नीलेश माने यांनी स्वतःचे पॅनेल टाकून आक्रमक निर्णय घेतला होता.

शिवसेना-राष्ट्रवादी तुल्‍यबळ

शिवसेनेचे विद्याधर बाजारे आणि ज्योती माने या उमेदवारांच्‍या पाठीशी राष्‍ट्रवादीची ताकद उभी राहिल्‍याने प्रभाग तीनमध्‍ये शिवसेना-राष्‍ट्रवादीच्‍या आव्‍हानाला भाजपला तोंड द्यावे लागणार आहे. त्यांच्याविरुद्ध भाजपकडून बाळासाहेब गोरेगावकर आणि सुप्रिया माने मैदानात आहेत. शिवसेना नेते वासुदेव माने आणि राष्ट्रवादीचे सुनील माने यांच्या एकत्रित शक्तीमुळे या प्रभागात युतीचे पारडे जड असल्याचे मानले जात असले, तरी मतदार कोणाच्‍या पारड्यात मते टाकणार हे येणारा काळच ठरवणार आहे.

ज्योती माने या नवख्या उमेदवार असल्या, तरी विद्याधर बाजारे हे गतवेळी नगरसेवक होते. त्‍यामुळे त्यांचा या प्रभागावर असलेला प्रभाव, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती या बाबी विचारात घेता, प्रभागात चांगले वलय असलेले भाजपचे बाळासाहेब गोरेगावकर यांना येथे प्रचारात आघाडी घ्‍यावी लागणार आहे.

नाराजांचे गणित महत्त्‍वाचे

शहरातील हाय व्‍होल्‍टेज लढत होत असलेल्‍या प्रभाग चारमध्‍ये नाराज कार्यकर्त्यांचे गणित कसे सोडवले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हा प्रभाग शहरातील सर्वात चर्चेचा मानला जातो. राष्ट्रवादीकडून बेदिल माने आणि काजल माने, तर भाजपकडून मयुरेश माने व शुभांगी माने मैदानात आहेत. या ठिकाणी अनेक इच्छुकांकडून अपक्ष अर्ज दाखल झाले होते; मात्र बहुतेक अर्ज मागे घेण्यात आले. काही कार्यकर्त्यांमध्ये अजूनही नाराजी असल्याची चर्चा आहे. ती नाराजी कोणाच्‍या पथ्यावर पडणार यावरच येथील निकाल अवलंबून राहणार आहे.

दोन्ही पक्षांना समसमान संधी

राष्ट्रवादीकडून अमर काटे आणि हसीना डांगे, तर भाजपकडून शैला भोसले आणि धनंजय पवार यांच्‍यात होणारी प्रभाग पाचमधील लढतही तशी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. मागील निवडणुकीत धनंजय पवार यांनी चांगली कामगिरी केली होती; परंतु या वेळी चारही उमेदवार तोलामोलाचे असल्याने पूर्णपणे चुरशीची आणि समसमान लढत होणार आहे. या प्रभागांमध्ये तिरंगी लढत होईल, असे असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते किरण भोसले यांनी कोणतीही भूमिका न घेतल्याने या प्रभागांमध्ये थेट लढत होणार आहेत.

माजी नगराध्‍यक्षांना आव्‍हान

प्रभाग सहामध्‍ये भाजपकडून माजी नगराध्‍यक्ष नाना राऊत व वनिता भोसले, तर राष्ट्रवादीकडून महेश मदने व सुनीता भोसले मैदानात आहेत. नाना राऊत हे गतवेळी राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्ष होते; परंतु अंतर्गत कारणांमुळे त्‍यांनी तो पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

त्‍यावेळी भाजपच्‍या कार्यकर्त्यांत काहीशी नाराजी निर्माण झाली; परंतु मतभेद दूर झाल्‍याने येथे भाजपची ताकद वाढली असली, तरी राष्‍ट्रवादीनेही अनेक वर्षे येथे केलेली बांधणी लक्षात घेता येथेही महेश मदने यांचे मोठे आव्‍हान राहणार असल्‍याचे दिसते. नाना राऊत यांची सुकापुरा पेठेत मजबूत पकड आहे, तर राष्ट्रवादीचे शशिकांत भोसले यांनी काशीद गल्लीत केलेले काम पाहता, येथे अत्यंत काट्याची लढत होणार आहे.

माने गटाचे वर्चस्‍व

प्रभाग सातमध्‍ये भाजपचे पारडे जड दिसत असले, तरी माने गटाचे वर्चस्व निर्णायक ठरणारे आहे. या प्रभागात भाजपचे किरण चव्हाण व सूरज गायकवाड, तर राष्ट्रवादीकडून सुरेखा माने व किरण गायकवाड मैदानात आहेत. राष्ट्रवादीने सुरेखा माने यांना संधी दिल्याने त्यांना कष्ट करावे लागतील. भाजपचा संपर्क वाढल्याने त्यांना सुरुवातीची आघाडी दिसते; परंतु माने कुटुंबाचे येथे प्रभावी वर्चस्व राहिल्‍याने, तेथे कशाप्रकारे रणनीती आखली जाते, यावरच प्रभागाची दिशा ठरू शकते.

युवकांची फळी निर्णायक

माजी नगराध्‍यक्ष आनंदा कोरे यांचे प्राबल्‍य असलेल्‍या प्रभाग आठमध्‍ये युवकांची फळी निर्णायक ठरणार आहे. या प्रभागात माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्या पत्नी मेघा कोरे आणि राजेश कदम हे राष्ट्रवादीकडून, तर भारतीय जनता पक्षाकडून युवराज कदम व योगिता लोहार मैदानात आहेत. राजेश कदम यांचे येथे स्थानिकांशी चांगले संबंध राहिले आहेत, तर भाजपने मोठे शक्तिप्रदर्शन करून कडवी लढत निर्माण केली आहे.

भावकीचे गणित महत्त्वपूर्ण

भाजपमधून (BJP) राष्ट्रवादीत प्रवेश केलेले महेश भोसले प्रभाग नऊमध्‍ये आपले नशीब आजमावत आहेत, तर भाजपकडून रणजित माने व योगिता लोहार मैदानात आहेत. या प्रभागातील मतदानाचे गणित भावकी व स्थानिक नातेसंबंधांवर अवलंबून राहणार असल्याने दोन्ही पक्षांना समान संधी असल्याची चर्चा आहे. महेश भोसले हे भाजपकडून या प्रभागात इच्छुक होते; परंतु रणजित माने यांनी या प्रभागात उमेदवारी मिळविल्याने, राजकीय वारसा असलेल्‍या महेश भोसले यांनी राष्‍ट्रवादीत जाऊन आपले आव्‍हान निर्माण केले आहे.

नवख्‍या उमेदवारांची थेट लढत

प्रभाग दहामध्‍ये नवख्या उमेदवारांची सरळ लढत होत आहे. येथे राष्ट्रवादीकडून विपुल साळुंखे आणि आरजू आतार, तर भाजपकडून गौतम जाधव आणि फरिदा मुल्ला मैदानात आहेत. प्रभागात चारही उमेदवार तोलामोलाचे असून, पूर्णपणे काट्याची लढत अपेक्षित आहे. या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे मानले जात असले, तरी मागील काही काळात भारतीय जनता पक्षाने केलेल्‍या कामाची दखलही नागरिकांकडून घेतली जाईल, अशी अपेक्षा पक्षाला आहे. काही प्रभागांमध्ये क्रॉस वोटिंग झाल्‍यास निकाल अनपेक्षित लागू शकतात, असेही बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT