

कऱ्हाड नगरपालिकेतील अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून उमेदवारांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे.
शिवसेना (शिंदे गट) आणि यशवंत विकास आघाडीचे राजेंद्र यादव यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेत राजकीय समीकरणात चर्चेला सुरुवात केली.
नगराध्यक्षपदासाठी १७ उमेदवार इच्छुक असून मतविभागणी टाळण्यासाठी अपक्षांचे अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी सुरू आहे.
Karad, 21 November : कऱ्हाड (जि.सातारा) नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजचा शेवटचा दिवस आहे. दुपारी तीनपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. मात्र, तत्पूर्वी शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांनी नगराध्यपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. यादव यांनी आज कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. त्यांनी नगराध्यक्षपदासाठी आणि कॉंग्रेसकडून दाखल झालेल्या उमेदवारी अर्जासंदर्भात चर्चा केली असून त्यावर काय निर्णय होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कऱ्हाड (Karad) नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३१ नगरसेवकपदाच्या जागेसाठी ३३० इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्जांच्या छाननीत ७१ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे २५९ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. त्यातील पाच अपक्ष उमेदवारांनी काल गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख असुन दुपारी तीपर्यंत मुदत आहे. त्यामुळे शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे मतविभागणीचा फटका बसू नये, यासाठी भाजप आणि शिंदे गटाचे (Shinde Group) यादव यांच्या यशवंत विकास आघाडीकडून जोर लावण्यात आला आहे. जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांची काल गुरुवारी रात्रीपासुन मनधरणी सुरु आहे. त्याला कितपत यश येईल हे आजच दुपारी तीन वाजता स्पष्ट होईल.
भाजपकडून नगराध्यपदासाठी विनायक पावसकर, शिवसेना शिंदे गट आणि यशवंत विकास आघाडीचे नेते यादव यांनी, कॉंग्रेसकडून झाकीर पठाण यांच्यासह अपक्ष असे मिळून १७ उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे नगराध्यदासाठी मोठी चढाओढ होणार आहे. अर्ज माघारीच्या दोन तास अगोदर आज शुक्रवारी यशवंत विकास आघाडीचे प्रमुख राजेंद्र यादव यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांच्यासोबत समर्थक माजी नगरसेवक तर कॉंग्रेसचे कऱ्हाड शहराध्यक्ष अमित जाधव, तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर व पदाधिकारी उपस्थित होते. ही भेट कऱ्हाड नगरपालिकेसाठी मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. नगराध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडूनही झाकीर पठाण यांचा उमेदवारी अर्ज आहे, त्यामुळे माजी मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या लढतीसंदर्भात काय निर्णय घेणार, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.
प्र.1 — कऱ्हाड नगरपालिकेसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटची वेळ कोणती?
→ आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.
प्र.2 — नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी कुणी जाहीर केली?
→ राजेंद्र यादव (शिवसेना-शिंदे गट व यशवंत विकास आघाडी).
प्र.3 — किती उमेदवार अर्ज शिल्लक आहेत?
→ २५९ अर्ज छाननीत वैध ठरले आहेत.
प्र.4 — मतविभागणी टाळण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
→ अपक्ष उमेदवारांची मनधरणी करून अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.