satej patil-Dhananjay Mahadik- Prashant Paricharak
satej patil-Dhananjay Mahadik- Prashant Paricharak Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात सतेज पाटील-महाडिक पुन्हा रंगणार सामना; तर सोलापुरात परिचारकांविरोधात कोण?

प्रमोद बोडके

सोलापूर : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड दिल्यानंतर आता आठ जागांसाठी पुन्हा एकदा रणांगण सज्ज होऊ लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेच्या आठ जागांसाठी येत्या एक ते दोन महिन्यात निवडणुका होण्याची शक्‍यता असल्याने राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीविरुध्द भाजप असाच सामना रंगणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांत, तसेच सोलापूर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या नगरमध्येही निवडणूक होत आहे, त्यामुळे या तीनही ठिकाणी काय निकाल लागतो? यावर भविष्यातील अनेक गणिते अवलंबून आहेत. (BJP will contest against Mahavikas Aghadi for eight seats in the Legislative Council)

सोलापूरचे अपक्ष आमदार प्रशांत परिचारक, नगरचे राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप, कोल्हापूरचे कॉंग्रेस आमदार तथा राज्यमंत्री सतेज पाटील, मुंबईतील कॉंग्रेस आमदार भाई जगताप, धुळे-नंदुरबारचे भाजप आमदार अमरिश पटेल, नागपूरचे भाजप आमदार गिरीश व्यास, शिवसेनेचे मुंबईतील आमदार रामदास कदम, शिवसेनेचे अकोला-बुलढाणा-वाशिम मतदार मतदार संघातील आमदार गोपिकिसन बाजोरिया या आठ जणांची मुदत 1 जानेवारी 2022 रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी या मतदार संघातील निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. या मतदार संघातील पात्र मतदारांची यादी निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून मागितली आहे. डिसेंबरमध्ये रंगणाऱ्या या राजकीय आखाड्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीतील निकालांचे पडसाद आगामी काळात होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्या, महापालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसणार आहेत. या आठ जागांमध्ये कॉंग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी दोन, राष्ट्रवादीच्या एक तर भाजपच्या दोन व भाजप पुरस्कृतच्या एका जागेचा समावेश आहे. या निवडणुकीत मोजके मतदार असल्याने निवडून येण्यासाठी आवश्‍यक असलेल्या क्‍लृप्त्या जो उमेदवार वापरतो, त्याचे पारडे जड मानले जाते. सोलापूरची जागा ही बहुतांशवेळा राष्ट्रवादीकडेच राहिलेली आहे. आगामी निवडणुकीत नगरची जागा राखण्यासोबतच सोलापूरची जागा खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादीला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. कोल्हापुरात धनंजय महाडिक-बंटी पाटील या राजकीय लढाईला विधान परिषदेच्या याच मतदार संघातील मागील निवडणुकीपासून कलाटणी मिळाली होती, त्यामुळे यंदा कोल्हापुरात काय होणार? याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोल्हापुरात उमेदवार कोणीही असला तरी महाडिक विरोधात पाटील असाच सामना होण्याची शक्यता आहे. सतेज पाटील मंत्री असल्याने काँग्रेसचे उमेदवार बहुधा तसेच असण्याची शक्यता आहे. भाजपची उमेदवार कोणालाही मिळाली तरी बंटी पाटलांच्या विरोधात महाडिक घराणे पूर्ण ताकदीनिशी उतरणार, हे मात्र नक्की. सोलापूर जिल्ह्यात मात्र भाजपकडून आमदार परिचारक पुन्हा उमेदवार असतील असेच सध्याचे चित्र आहे. पण त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण लढणार आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

शिक्षक, पदवीधरमुळे वाढला आत्मविश्‍वास

यापूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीने पुणे पदवीधरमध्ये दिमाखदार यश मिळविले आहे. नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षकमध्ये कॉंग्रेसलाही जबरदस्त यश मिळाले. त्यामुळे पुण्यापासून नागपूरपर्यंत कॉंग्रेसचा आत्मविश्‍वास वाढला आहे. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नागपूर पदवीधरमध्ये भाजपच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर आता नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महाविकास आघाडी काय चमत्कार घडविणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT