Dhangar Reservation Issue Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhangar Reservation : 'धनगर कार्यकर्त्यास झालेल्या मारहाणीचे परिणाम भाजपला भोगावे लागतील; काळेंवर गुन्हा दाखल करा'

Vijaykumar Dudhale

Solapur News : धनगर आरक्षणावरून सोलापुरात राजकीय धुळवड सुरू झाली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळणारे धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वय शेखर बंगाळे यांना भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे व इतरांकडून मारहाण झाली. त्याचा काँग्रेस पक्षाकडून निषेध करण्यात आला. काळे यांनी धनगर समाजाची जाहीर माफी मागावी; अन्यथा त्यांचे शहरात फिरणे मुश्किल होईल. तसेच या मारहाणीचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, असा इशाराही धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिला आहे. (BJP will have to bear consequences of beating Dhangar activist; Congress warning)

धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वयक शेखर बंगाळे आणि इतरांनी सोलापूरच्या शासकीय विश्रामृहात जाऊन पालकमंत्री विखे पाटील यांना निवेदन दिले. त्यावेळी बंगाळे यांनी विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला. त्या वेळी तिथे उपस्थित असलेले भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी इतरांनी बंगाळे यांना मारहाण केली होती. त्याचा धनगर आरक्षण कृती समितीचे प्रमुख चेतन नरोटे यांनी निषेध केला.

नरोटे म्हणाले की, धनगर आरक्षण हा आमचा हक्क आहे. त्यासाठी आमचा समाज अनेक वर्षांपासून लढत आहे. आमच्या बांधवांना झालेली मारहाण ही निषेधार्ह आहे. ज्या नरेंद्र काळे यांनी आमच्या बांधवांना मारहाण केली, त्यांना भान राहिलेले नाही. चाकरीला असल्यासारखे समाज बांधवांना मारहाण करणाऱ्या काळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे.

धनगर समाज बांधव गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी रस्त्यावर लढा देत आहे. ‘आमची सत्ता आल्यास कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकालात काढला जाईल’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्या गोष्टीला आता दहा वर्षे उलटून गेली आहेत, तरीही आरक्षण मिळालेले नाही. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते, त्यातूनच धनगर समाजाच्या संयमाचा बांध आत फुटू लागलेला आहे. राज्यकर्त्यांकडून आरक्षण देण्यास टाळाटाळ केली जात आहे. या गोष्टीने धनगर समाजाचे तरुण पेटून उठले आहेत, असे चेतन नरोटे यांनी सांगितले.

नरोटे म्हणाले की, सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देताना धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वयक शेखर बंगाळे यांच्या भावनेचा उद्रेक होऊन त्यांनी भंडारा पालकमंत्र्यांच्या अंगावर उधळला. वास्तविक, तसे व्हायला नको होते; परंतु जेव्हा भावनेचा उद्रेक होतो, त्यावेळी योग्य काय आणि अयोग्य काय, हे कळत नाही. अशा भावनिक प्रसंगात घडलेले हे कृत्य आहे. मात्र, त्या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सामोपचाराची भूमिका घ्यायला हवी होती. मात्र, त्यांनी समाजबांधवांवर हात उचलणे चुकीचे आहे. त्याचा आम्ही काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून निषधे करतो.

भाजपने आता समाजापुढे येताना दहा वेळा विचार करावा. नरेंद्र काळे यांचे कृत्य म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ असेच आहे. कोणत्याही समाजाचे आंदोलन चिरडून काढण्यासाठी अशा कार्यकर्त्यांचा वापर भाजप सातत्याने करतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. नरेंद्र काळे यांनी धनगर समाजाची जाहीर माफी मागावी; अन्यथा त्यांना सोलापूर शहरात फिरणे मुश्किल होईल, असे आंदोलन धनगर समाजाच्या वतीने केले जाईल. धनगर कार्यकर्त्यास झालेल्या मारहाणीचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, असा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT