Pandharpur News : शिवशक्ती परिक्रमा करणाऱ्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पंढरपुरात खळबळजनक वक्तव्य केले आहे. गोपीनाथ मुंडेंपेक्षा मी वेगळी आहे अन् त्यांच्यापेक्षा पुढची हे काळचं ठरवेल, असे विधान त्यांनी केले आहे. पंकजा यांच्या या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली असून परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर खरोखरच पंकजा मुंडे काही वेगळा राजकीय निर्णय घेणार की काय, अशी चर्चा पुन्हा रंगली आहे. (I am different from Gopinath Munde : Pankaja Munde)
माजी मंत्री पंकजा मुंडे सध्या शिव-शक्ती परिक्रमा यात्रा करत आहेत. त्यांची यात्रा आज कोल्हापूर, सांगलीचा दौरा करून गुरुवारी (ता. ७) सायंकाळी पंढरपुरात दाखल झाली. त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. भाजप कार्यकर्त्यांनी मुंडे यांचे जोरदार स्वागत केले.
पांडुरंगाच्या दर्शनानंतर मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी भाजपमध्ये नाराज नाही. मध्य प्रदेशची जबाबदारी पक्षाने माझ्याकडे दिली आहे. मी त्या ठिकाणी काम करत आहे. मी नाराज असल्याच्या बातम्या माध्यमांमधूनच येतात. वस्तुस्थिती वेगळी असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, लेकुरवाळा देव म्हणून विठ्ठलाला ओळखले जाते. भक्तांचा कायम गराडा विठ्ठलाभोवती असतो, तशी मीही लेकुरवाळा नेता आहे. माझ्या स्वागताला ठिकठिकाणी लोक येतात. गर्दी होते, त्यात माझा काय दोष आहे. संघाच्या शिस्तीत मी वाढलेली असून प्रमाणिकपणे पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडते. ही शिवशक्ती परिक्रमा राजकीय यात्रा नाही. केवळ १५ लोक माझ्यासोबत आहेत. परंतु अनेजण स्वतः या परिक्रमेत येत आहेत. त्यातूनच भव्य असे स्वरूप परिक्रमेला आलेले. माझ्या स्वागताला लोक गर्दी करतात, याद्वारे शक्तिप्रदर्शन होत असेल तर त्याला मी काय करू शकत नाही.
माजी मंत्री महादेव जानकर यांचा स्वतंत्र राष्ट्रीय समाज पक्ष आहे. अन्याय होत असेल तर ते स्वतः निर्णय घेऊ शकतात. त्यांच्या पक्षाचं भविष्य त्यांनी पाहावे. गोपीनाथ मुंडे यांच्यापेक्षा मी वेगळी आहे. तसेच मी त्यांच्या पुढे असेल, हे आगामी काळच ठरवेल, असेही विधान त्यांनी तुम्ही भाजपात नाराज आहात का या प्रश्नाला उत्तर देताना केले. या वेळी मंदिर समितीच्या मुख्यधिकारी राजेंद्र शेळके, मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे, शंकुतला नडगिरे यांच्या हस्ते पंकजा मुंडे यांचा सत्कार केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.