Dhairyasheel Kadam sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli-Satara MLC Result : सांगली-सातारमधून भाजपच्या धैर्यशील कदमांची बाजी; महायुती अभेद्य, तुतारी वाजलीच नाही

Dhairyasheel Kadam News : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम ५९१ मते मिळवत विजयी झाले. अभयसिंह जगताप यांचा पराभव झाला असून महायुतीची एकजूट कायम राहिल्याचे सिद्ध झाले.

Vijaykumar Dudhale

Satara, 22 June : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुती अभेद्य राहिली असून भारतीय जनता पक्षाचे धैर्यशील कदम हे ५९१ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांचा दणदणीत मतांनी पराभव केला आहे. जगताप यांनी काही प्रमाणात मते फोडली असली तरी महायुती एकसंघ राहिल्यानेच हा विजय मिळाल्याचे दिसून येते. या विजयामुळे ग्रामविकास मंत्री गोरे यांचे राजकीय वजन वाढल्याचे मानले जात आहे.

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी चुरशीने ९९ टक्के मतदान झाले होते. दोन्ही उमेदवार हे सातारा जिल्ह्यातील असल्याने विजय कोण मिळविणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच भाजपचे धैर्यशील कदम यांनी आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत टिकवत कदम यांनी विजयाला गवसणी घातली आहे.

धैर्यशील कदम यांना ५९१ मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांना २९२ मते मिळाली आहेत. कदम यांनी या निवडणुकीत तब्बल २९९ मतांनी बाजी मारली असून जगताप यांना पुन्हा एकदा पराभावाला सामोरे जावे लागले आहे.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महायुतीमधील आपले मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फोडून सत्ता स्थापन केली हेाती. त्यावेळी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे महायुतीमधील दोन्ही पक्ष भाजपवर नाराज होते.

सांगलीत महायुतीबरोबरच महाविकास आघाडीची ताकद होती, त्यामुळे सांगली सातारा निवडणुकीत दुखावलेल्या मित्रपक्षांनी वेगळी भूमिका घेतली असती तर भाजपचे धैर्यशील कदम यांना धोका होऊ शकतो, हे ओळखून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी वरिष्ठ पातळीवर सूत्र हलवली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये बैठक झाली. त्या बैठकीत सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचं ठरलं आणि त्यानुसार स्थानिक नेतृत्वाला तसा निरोप देण्यात आला. त्यानुसार नाराज असलेले मित्रपक्षांनी मतदानाच्या एक दिवस अगोदर भाजपला पाठिंबा जाहीर केला, त्यानुसार महायुतीने एकत्रिपणे काम करत भाजपचे कदम यांना निवडून दिल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT