Dharmraj kadadi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Loksabha : सिद्धेश्वर कारखाना बंद पाडून मला संपविण्याचा भाजपचा डाव होता; धर्मराज काडादींनी ठेवले मर्मावर बोट...

LoKsabha Election 2024 : ज्येष्ठ नेते शरद पवार त्या प्रकरणात पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. वसंतदादा शुगर इन्टिट्यूटचे तज्ज्ञ पाठवून जुन्या चिमणीवर कारखाना सुरू केला. सिद्धेश्वर कारखाना बंद पाडून शेतकऱ्यांना कमी भाव देत मोठा नफा कमविण्याचे त्यांचे स्वप्न आपण धुळीस मिळविले

Vijaykumar Dudhale

Solapur, 05 May : भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी फक्त द्वेषाचे राजकारण केले. मी नेतृत्व करत असलेल्या संस्थांमध्ये अडथळे आणण्याचे प्रयत्न केले गेले. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बंद पाडून मला संपविण्याचा त्यांचा डाव होता. त्यामुळे कारखान्याची चिमणी पाडण्यात आली. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार त्या प्रकरणात पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. वसंतदादा शुगर इन्टिट्यूटचे तज्ज्ञ पाठवून जुन्या चिमणीवर कारखाना सुरू केला. सिद्धेश्वर कारखाना बंद पाडून शेतकऱ्यांना कमी भाव देत मोठा नफा कमविण्याचे त्यांचे स्वप्न आपण धुळीस मिळविले, अशा शब्दांत सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी चिमणी पाडण्यामागील षडयंत्र जनतेसमोर मांडले.

दरम्यान, सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर सर्वप्रथम धावून आलेल्या सोलापूर लोकसभेच्या (Solapur Loksabha) उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या पाठीशी दीड लाख मतांचे पाठबळ उभे करण्याचे आवाहन काडादी यांनी केले. शेतकरी व कामगारांनी मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सिद्धेश्वर परिवाराने शेतकरी आणि कामगार मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्या काडादी यांनी सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीबाबत भाष्य केले. या वेळी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते, प्रकाश वानकर, मल्लिकार्जुन पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, देशातील भ्रष्टाचार संपवून, महागाई कमी करत अच्छे दिन आणण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले. त्यामुळे जनतेने त्यांच्या हाती बहुतमाने देश दिला. सुशीलकुमार शिंदे यांना बाजूला सारून भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचे काम जनतेने केले. पण, भाजपच्या लोकप्रतिनिधींनी द्वेषाचेच राजकारण केले. भाजपच्या लोकांनी मनात आणले असते तर अगदी चार-पाच महिन्यांत विमानतळाचा विकास झाला असता. परंतु त्यांनी तसे केले नाही. लोकसभेपासून महापालिकपर्यंत सर्वत्र त्यांची सत्ता होती. मात्र, ते जनतेचा प्रश्न सोडवू शकले नाहीत.

विमानसेवेसाठी चिमणीचा अडथळा नव्हता

विमानसेवेसाठी सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा येत नव्हता. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचीही विमाने उतरली आहेत. चिमणी पाडल्यानंतरही विमानसेवेला एअर एव्हीएशन परवानगी मिळणार नाही, असे आपण अगोदरच सांगितले होते. तरीही भाजपने कारखान्याची चिमणी पाडून नुकसान केले. चिमणी पाडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विमानसेवा सुरू करू म्हणणारे आता कुठे आहेत, असा सवाल सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित केला.

चिमणी पाडणाऱ्यांना जागा दाखवा

केंद्रातील मोदी सरकारने देशातील बड्या उद्योगपतींचे साडेसोळा लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. एवढ्या पैशातून देशातील शेतकऱ्यांचे 24 वेळा कर्ज माफ झाले असते. सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडणाऱ्या भाजपच्या नेतेमंडळींना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन ळी माजी मंत्री सिध्दराम म्हेत्रे यांनी केले.

निवडणूक लढविण्याची प्रेरणा शेतकऱ्यांकडून मिळाली

लोकसभेची निवडणूक लढवावी की नाही, या मनस्थिती मी होते. मात्र, ग्रामीण भागाचा दौरा केला. त्या वेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील दुःख व हताशपणा पाहून वाईट वाटले. तीच मला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पहिली प्रेरणा देऊन गेली. त्यामुळे संसदेत पहिला आवाज शेतकऱ्यांचाच उठवेन अशी ग्वाही प्रणिती शिंदे यांनी दिली.

सुभाष देशमुखांनाही शेतकरी घरी बसवतील

सिध्देश्वर परिवाराच्या पहिल्या बैठकीत मी चिमणी पाडलेल्यांचा बदला घ्या, असे म्हटले होते. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या तोंडी असे शब्द शोभणारे नाहीत असे म्हटले. आमदार देशमुख यांनी गेल्या वीस वर्षांत ज्या पध्दतीने द्वेषाचे राजकारण केले, ते सिध्देश्वर परिवाराला रूचले नाही. त्यामुळे आगामी काळात सिध्देश्वर परिवारातील शेतकरी आणि कामगार त्यांनाही घरी बसवतील, असा टोला धर्मराज काडादी यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT