Solapur DCC Bank Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur DCC Bank : सोसायटी मतदारसंघातून घेतले बिगर नावाचे (कोरे) ठराव; भाजप नेत्याचीच सहनिबंधकांकडे तक्रार

Subhash Deshmukh Complaint : सोलापूर डीसीसी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापुरातील सहकारी सोसायटी गटाच्या मतदारयादीवरून वाद निर्माण झाला आहे. कोरे ठराव घेऊन मतदारयादी तयार केल्याची तक्रार आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 29 August : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रातील घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीसाठी ११ तालुक्यांतून मतदान प्रतिनिधींचे ठराव घेतले जात आहेत. यात दक्षिण सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असून सहकारी सोसायटी गटातून कोरे (रिकामे) ठराव करून मतदारयादी बनवली जात आहे, अशी तक्रार माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी पुणे विभागीय सहनिबंधकाकडे केली आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या मतदारयादीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

सोलापूर जिल्हा बॅंकेवर आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेली बॅंक ताब्यात घेण्याचा चंग भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बांधला आहे. त्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजेंद्र राऊत, सचिन कल्याणशेट्टी यांनी कंबर कसली आहे. त्यांना इतर नेत्यांची साथ लाभत आहे.

मतदार प्रतिनिधी निवडीसाठी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे ठराव घेतले जात आहेत. हे ठराव आपल्या बाजूने जास्तीत व्हावेत, यासाठी सत्ताधारी भाजप नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच कोरे ठराव घेण्याचे पेव फुटल्याची चर्चा आहे. त्यावरच आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूरचे उदाहरण समोर ठेवून बोट ठेवले आहे.

त्यासंदर्भात आमदार देशमुख यांनी पुण्याच्या सहनिबंधकांकडे तक्रार केली आहे. त्यात देशमुख यांनी म्हटले आहे की, दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष व सचिव हे संगनमत करुन गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालकांना विश्वासात न घेता प्रोसिडींग बुकवर फसवून सह्या घेत आहेत. संबंधित प्रोसिडींग बुक तालुक्यातील एका माजी संचालकाच्या स्वाधीन केले जात आहे.

या सर्व गोष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या एकाही संचालकाला विश्वासात न घेता फसवणूक करुन सह्या घेतल्या आहेत. अशा पद्धतीने ठराव केल्यास संचालकाच्या अधिकारावर गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे येणाऱ्या ठरावाची पडताळणी करण्याची सूचना द्यावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे.

प्रत्येक सोसायटीस आपण सुचित करावे की, प्रत्येक ठराव हे ज्या त्या सोसायटी कार्यालयात घेऊन किंवा ‘जीपीएस’द्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आपणाकडे ठराव घ्यावेत. तसे ठराव करताना निबंधक कार्यालयाकडून प्रत्येक सोसायटीत एका स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे.

रिकाम्या ठरावासाठी नेत्याचे फोन

दरम्यान, आणखी एका तालुक्यातही सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडून कोरे ठराव घेतल्याची चर्चा आहे. काही सोसायटीच्या अध्यक्षांना संबंधित नेत्याने फोन करून रिकामे (कोरे) ठराव घेतल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT