

Solapur, 28 August : राज्यातील बिडी कामगारांना किमान वेतन लागू करण्याच्या निर्णयाविरोधात सोलापुरातील बिडी उद्योजकांनी उद्योग स्थलांतरित करण्याचा किंवा परराज्यात जाण्याचा इशारा दिला. दुसरीकडे कामगार संघटनांनीही बिडी कामगारांना एक हजार विडीमागे ३७९ रुपये वेतानावर ठाम आहेत. त्यामुळे हा प्रश्न चिघळला आहे. त्या वादात आता भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी एन्ट्री घेतली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
दरम्यान, आमदार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी ‘राज्यातील बिडी कामगारांचा रोजगार अबाधित ठेवून महाराष्ट्रातील बिडी उद्योग परराज्यात स्थलांरित होणार नाही, यासाठी योग्य आणि तातडीने तोडगा काढावा,’ अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात विजयकुमार देशमुख यांनी म्हटले आहे की, सोलापूर शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारा बिडी उद्योग आहे. या उद्योगावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सुमारे ३० ते ४० हजार कामगार आणि त्यांचे कुटुंबीय अवलंबून आहेत.
कामगार मंत्रालयाने सध्या बीडी कामगारांच्या किमान वेतनासंदर्भात निर्णय घेतला आहे. (सध्या एक हजार बिडीमागे कामगारांना २४५ रुपये मजुरी मिळते. किमान वेतनानुसार त्यात वाढ करून एक हजार बिडीमागे ३७९ रुपये वेतन देण्याचा कामगार मंत्रालयाचा आदेश आहे) राज्यातील बिडी कामगारांचे किमान वेतन हे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत, त्यामुळे सोलापूरमधील बिडी उद्योजकांकडून उद्योग परराज्यात स्थलांतरित करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
महाराष्ट्राबाहेर किमान वेतन हे आपल्यापेक्षा कमी आहेत, त्यामुळे उद्योजकांचा कल इतर राज्यांकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही, तशा नोटिसा कारखान्यात लावण्यात आल्या आहेत, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, सोलापूर शहरातील बिडी उद्योग बंद पडला अथवा परराज्यात स्थलांतरित झाला, तर सुमारे ३० ते ४० हजार कामगारांच्या रोजगारावर थेट परिणाम होऊ शकतो. विशेषतः अल्प उत्पन्न गटातील महिला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
बिडी कामगारांच्या किमान वेतनाचे संरक्षण करणे जितके आवश्यक आहे, तितकेच हे उद्योगाचे अस्तित्व, रोजगारनिर्मिती व कामगारांच्या उपजीविकेचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. त्यामुळे किमान वेतन तर निशित करताना बिडी उद्योग परराज्यात स्थलांतरित होणार नाही, यासाठी तातडीने सर्व संबंधित घटकांची बैठक घेऊन समतोल व व्यवहार्य तोडगा काढणे आवश्यक आहे, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
अन्यथा, हजारो बिडी कामगारांचा रोजगार धोक्यात येऊन त्यांच्यामध्ये सरकारबाबत तीव्र असंतोष आणि गैरसमज निर्माण होऊ शकतो, या परिस्थितीचा राजकीय विपरीत परिणाम होऊन इतर राजकीय पक्षांकडून या विषयाचे भांडवल केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा विषय संवेदनशील असून तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे,असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.