Sharad Pawar, Rajendra Patil Yadravkar, Ajit Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajendra Patil Yadravkar News : शिंदे गटाच्या जाळ्यात असलेल्या आमदाराला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून गळ

Rahul Gadkar

Kolhapur News : शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत माजी आरोग्य राज्यमंत्री म्हणून यड्रावकर यांची निवड झाली. शिवसेनेत बंड झाल्यानंतर यड्रावकर हे शिंदे गटासोबत राहिले. यड्रावकर अपक्ष असले तरी आता दोन्ही राष्ट्रवादीकडून त्यांना गळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा पार पडला. या दौऱ्याच्यानिमित्ताने लावण्यात आलेल्या मेळाव्याच्या फलकावर यड्रावकर झळकले होते. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. (Rajendra Patil Yadravkar News)

आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे कुटुंब पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोबत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) त्यांच्यासोबत त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) आघाडीत असल्याने शिरोळ विधानसभा मतदारसंघ हा स्वाभिमानीकडे राहिला. त्यावेळी राष्ट्रवादीकडून यड्रावकर इच्छुक होते. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. यड्रावकर आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेसोबत (ShivSena) जाण्याचा निर्णय घेतला.

पंधरा दिवसांपूर्वी माजी आरोग्यमंत्री आणि आमदार राजेश टोपे यांनी जयसिंगपूर येथे राहत्या घरी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेतली. या भेटीमध्ये यड्रावकर यांनी राष्ट्रवादीसोबत यावे, अशी चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र टोपे आणि आमची मैत्री राजकारणाच्या पलीकडची असल्याचे सांगितले गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा कागलमधील मेळावा झाला. या मेळाव्याच्या एका फलकावर राजेंद्र पाटील यांचा फोटोही लावण्यात आला होता. त्यामुळे शिंदे गटात सोबत असलेले यड्रावकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत की काय? अशीही चर्चा आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावर प्रतिक्रिया दिली. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे अपक्ष आमदार आहेत. अपक्ष आमदार हे कोणत्या पक्षाचे नसतात. ते पूर्वी राष्ट्रवादीचेच होते. पण आता शिंदे गटासोबतच आहेत. आमचे आणि त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने त्यांचा फोटो लावण्यात आला, अशी प्रतिक्रिया दिली.

(Edited By - Rajanand More)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT