Uddhav Thackeray -Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena-Shivsena UBT Yuti : दोन्ही शिवसेना अखेर एकत्र; बार्शीतील दिलीप सोपलांच्या प्रयोगाची राज्यभरात चर्चा

Barshi Political News : बार्शी तालुक्यात भाजपविरोधात दोन्ही शिवसेना गट एकत्र आले आहेत. दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखालील ही आघाडी राजेंद्र राऊतांसाठी मोठे आव्हान ठरणार असून स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 24 January (उमेश पवार) : संपूर्ण राज्यात एकमेकांच्या विरोधात मोठ्या त्वेषाने लढणाऱ्या दोन्ही शिवसेना (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एकत्र आल्या आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. बार्शीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून विस्तवही जात नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिंदे हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर तुटून पडतात. पण एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या या दोन्ही शिवसेना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकत्र आल्या आहेत.

विशेष म्हणजे, बार्शी (Barshi) नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र होते. शिवसेनेला भाजपने नगरसेवकपदाच्या सहा जागाही दिल्या होत्या. त्या सहाही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनाही सोबत घेतले आहे.

असे आहे झेडपीचे जागावाटप

बार्शी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा, तर पंचायत समितीच्या १२ जागा आहेत. यातील उपळे दुमाला आणि पानगाव जिल्हा परिषद गट हे शिवसेनेला जागा वाटपात देण्यात आले आहेत. उपळाई (ठोंगे), पांगरी, शेळगाव (आर) हे तीन गट राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेले आहेत, तर मालवंडी या एकाच गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निवडणूक लढवत आहे.

गणात राष्ट्रवादीला झुकते माप

पंचायत समितीच्या बारा जागांपैकी सात गण हे राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आह. यामध्ये पांगरी, कारी, सासुरे, मानेगाव, शेळगाव, उपळाई (ठोंगे), आगळगाव या पंचायत समिती गणांचा समावेश आहे. शिवसेनेला चार जागा मिळाल्या असून त्यात उपळे दुमाला, गौडगाव, बावी, पानगाव हे पंचायत समिती गण शिंदेसेनेच्या वाट्याला गेले आहेत. मालवंडी हा एकमेव गण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवत आहे. बार्शीचा आमदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असताना केवळ दोन जागा पक्ष लढवत आहेत, त्यामुळे या युतीची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

भाजपला रोखण्यासाठी एकत्र : उमेश पाटील, तर आम्ही भाजपसोबतच : आंधळकर

दरम्यान, भाजपला रोखण्यासाठी बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणासाठी शिवसेनेबरोबर युती केली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले. मात्र, शिवसेनेचे बार्शी शहरातील नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी मात्र शिवसेना भाजपसोबत असल्याचा दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT