MLA Mahesh Shinde, Madan Bhosale
MLA Mahesh Shinde, Madan Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'किसन वीर'चा जरंडेश्‍वर करण्याचा डाव मोडून काढा...महेश शिंदे

विलास साळुंखे

भुईंज : सर्वत्र खासगीकरणाचा बारामतीचा फेरा पडत असून तो किसन वीर कारखान्यावर पडू नये यासाठी जागरुक रहा. आता मी आलोय. मी स्वत: या कारखान्यात लक्ष घातले असून सभासद शेतकर्‍यांचीच मालकी कायम ठेवून दोन वर्षातच किसन वीर अडचणीतून बाहेर काढून दाखवेन, असा विश्‍वास कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी व्यक्‍त केला.

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचारासाठी झालेल्या या बैठकीत ते बोलत होते. महेश शिंदे म्हणाले, जरंडेश्‍वर खासगी केला. रयत शिक्षण संस्थेसाठी सातारा जिल्ह्याने योगदान दिले. कर्मवीर अण्णांनी आयुष्यभर अनवाणी राहून, त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई पाटील यांनी स्वत:चे मंगळसूत्र मोडून रयत उभारली. आज ती जवळपास खासगी केल्यासारखी केली आहे.

कै. मदनआप्पांनी उभारलेल्या सूतगिरणीला दीड कोट यांनी जिल्हा बँकेतून मिळू दिले नाहीत. पण, बारामतीकरांच्या खासगी उद्योग समूहाला एका रात्रीत 670 कोटी रुपये दिले. या हडपणार्‍या, खासगीकरण करणार्‍या प्रवृत्तीला खरं तर इथल्या सर्वच नेत्यांनी विरोध केला पाहिजे. पण राष्ट्रवादीचे इथले नेते मूग गिळून गप्प आहेत. नेत्यावर प्रेम असावं पण शेतकर्‍यांना, स्थानिक जनतेला देशाधडीला लावणार्‍या प्रकारांना विरोध करुन जनतेशी बांधिलकी जपली पाहिजे.

स्वत:च्या नेत्यापर्यंत जनतेच्या भावना पोहोचवल्या पाहिजेत. किसन वीर कारखाना जर विरोधकांच्या ताब्यात गेला तर तो बारामतीकरांच्याच चरणी अर्पण करतील. जिल्ह्यातील सहकार संपवण्याच्या कामाला वेग येईल. मदनदादांना विरोध करत किसन वीर कारखाना अडचणीत आणण्याचे काम केले, खेळते भांडवल मिळू दिले नाही. वर पुन्हा कारखान्याच्या विरोधात आवई उठवत आहेत.

मी आता आलोय. मी स्वत: लक्ष घालून येत्या दोन ते तीन वर्षात कारखान्याची गाडी रुळावर आणून शेतकर्‍यांच्या मालकीच्या कारखान्याला गतवैभव मिळवून देईन. हा कारखाना शेतकर्‍यांच्याच मालकीचा ठेवायचा असेल तर शेतकरी विकास पॅनेलच्या पाठिशी उभे रहा. घरात अडचणी आल्या तर आपण घर नाही पेटवून देत तर अडचणी दूर करतो. ती अडचण दूर करण्याची ग्वाही मी देतो, असेही आमदार महेश शिंदे यांनी ठामपणे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT