Cargo transport from Kolhapur Airport
Cargo transport from Kolhapur Airport  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरसाठी गूड न्यूज : कार्गो वाहतूक सेवा सुरू होणार

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : कोल्हापूर विमानतळावरुन (Kolhapur Airport) कार्गो वाहतूक (Cargo transport) सेवेसाठी (मालवाहतूक) भारतीय नागरी विमान सुरक्षा ब्यूरोने (बीसीएएस) मान्यता दिली आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या शेती, शेतीपूरक व्यवसाय, स्थानिक उद्योग आणि व्यवसाय वाढीला चालना मिळणार आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी दिली. (Cargo transport service will start from Kolhapur Airport)

दरम्यान, ही कार्गो विमान सेवा तत्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सुरवातीच्या टप्प्यात सध्या संचालित होणाऱ्या विमानांमधून कार्गो सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या बुकिंगची व्यवस्था संबंधित विमान कंपनीच्या प्रवासी बुकिंग काऊंटरवर सुरू केली जाणार आहे. तसेच कार्गो सेवेचा प्रतिसाद पाहून पुढील टप्प्यात विशेष कार्गो विमानांचे टेक ऑफ कोल्हापूर विमानतळावरून होईल.

बीसीएएसच्या निरीक्षकांनी १५ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावरून कार्गो सेवेसाठीच्या उपलब्ध सोय व संधी याची चाचपणी केली होती. त्यासंबंधीचा अहवाल दिल्लीस्थित डायरेक्टर जनरल यांना सादर केल्यानंतर त्यांच्याकडून कोल्हापूरहून कार्गो सेवेसाठी हिरवा कंदील मिळाला आहे.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, कोल्हापूर विमानतळाहून कार्गो वाहतूक सेवेला मंजुरी मिळाल्यामुळे जिल्ह्यातील उद्योजक आणि शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. त्याचबरोबर स्थानिक उद्योगांना, शेती व शेतीपूरक उत्पादनाला उत्तेजन मिळेल. कृषी उत्पादन, औद्योगिक, दुग्धोपादन आणि वैद्यकीय क्षेत्रातून या कार्गो सेवेची मागणी होत होती. विमानतळावर कार्गो सेवेला मंजुरी मिळाल्यामुळे कोल्हापूरसह आजूबाजूच्या परिसरातील शेतमाल, उद्योगांच्या हवाई वाहतुकीसाठी या सेवेचा मोठा फायदा होईल.

कोल्हापूर येथील स्थानिक उत्पादन अन्य राज्यांबरोबरच आंतरराष्ट्रीय विमानतळाहून परदेशी बाजारपेठेत जाऊन जिल्ह्याचा विकास साधला जाईल. येथील स्थानिक उद्योगांचे मूल्य वाढेल. विमानतळाची कार्गो सेवा जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक स्वरुपावर सकारात्मक दीर्घकालीन परिणाम निर्माण करेल, असा आशावादही पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT