Aryan Sugar Factory Loan Case Sarlarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : आमदार सोपलांचे बंधू, पुतणे, भावजय अन्‌ सुनेसह दहा जणांवर गुन्हा दाखल; आर्यन शुगरने परस्पर विकली साखर

Aryan Sugar Factory Loan : बार्शी तालुक्याच्या खामगाव येथील आर्यन शुगर कारखान्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ५५ कोटी रुपये कर्ज घेतले होते. आर्यन शुगरने 18/09/2012 ते 03/05/2014 या कालावधीत तारण ठेवलेली साखर पोती बँकेच्या परस्पर विकली.

प्रमोद बोडके

Solapur, 05 January : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची फसवणूक केल्या प्रकरणी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचे बंधू, पुतणे, भावजय आणि सुनेसह दहा जणांवर बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आर्यन शुगर कारखान्याला कर्ज देताना तारण म्हणून उत्पादीत साखर ठेवण्यात आली होती. मात्र, कारखान्याने साखरेची परस्पर विक्री करून जिल्हा बॅंकेची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद जिल्हा बॅंकेच्या बार्शी शहरातील मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी राहुल खुने यांनी दिली होती. त्यानुसार सोपल यांच्या निकटवर्तीयांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

आर्यन शुगरचे (Aryan Sugar) संचालक योगेश सुधीर सोपल (रा. सोपल बंगला, आगळगाव रोड, बार्शी), सुधीर गंगाधर सोपल (रा. सोपल बंगला आगळगाव रोड, बार्शी), अलका सुधीर सोपल ( रा. सोपल बंगला आगळगाव रोड, बार्शी), उज्वला योगेश सोपल (रा. सोपल बंगला आगळगाव रोड, बार्शी), विलास दगडूअप्पा रेणके (रा. किराणा रोड, बार्शी,), अविनाश बसंतराव भोसले (रा. सेकंड क्रॉस, सदाशिव नगर, बेळगाव, जि. बेळगाव, कर्नाटक), श्रीकांत गोपाल नलवडे (रा. हुपरी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), राजू बसंतराव भोसले (रा. मेन सेकंड क्रॉस, सदाशिव नगर, बेळगाव, जि. बेळगाव, कर्नाटक), तत्कालीन शाखाधिकारी आर. एस. उंबरदंड, बँक इन्स्पेक्टर व्ही. एस. आगलावे अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

बार्शी तालुक्याच्या खामगाव येथील आर्यन शुगर कारखान्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (Solapur DCC Bank) ५५ कोटी रुपये कर्ज घेतले होते. कर्ज घेताना कारखान्याचे संचालक योगेश सुधीर सोपल व विलास दगडूअप्पा रेणके यांनी 55 कोटीचा कर्ज रोखा, सतत चालू राहणाऱ्या तारणाचा दस्त, वचन पत्रिका, वचन चिट्टी, 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्लेज डीड बँकेच्या नावाने कारखान्याच्या सर्व संचालकांच्या वतीने करून दिले होते. तसेच, मंजूरी पत्रातील 1 ते 45 अटी मान्य असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, आर्यन शुगरने 18/09/2012 ते 03/05/2014 या कालावधीत तारण ठेवलेली साखर पोती बँकेच्या परस्पर विकली. साखर विक्रीतून आलेली रक्कम मालतारण कर्ज खात्यात न भरता ती रक्कम कारखान्याच्या इतर कर्ज खात्यामध्ये भरण्यात आली होती.आर्यन शुगर कारखान्याकडे आजपर्यंत मालतारण कर्ज रक्कम 42 कोटी 25 लाख 49 हजार 484 रुपये आणि त्यावर होणाऱ्या व्याजाच्या रक्कमेची फसवणूक आणि अपहार करून बँकेचे आर्थिक नुकसान केले आहे, असे राहुल खुने यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.

कर्ज घेताना तारण ठेवण्यात आलेली साखर विक्री करून सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा बँकेची ४२ कोटी २५ लाख ४९ हजार ४८४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्यन शुगरचे संचालक योगेश सोपल, तत्कालिन शाखाधिकारी आर. एस. उंबरदंड, बँक इन्स्पिेक्टर व्ही. एस. आगलावे यांच्यासह दहा जणांवर बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT