Kalyanrao kale
Kalyanrao kale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kalyanrao Kale : राष्ट्रवादीच्या काळेंना दणका : ‘सीताराम’च्या शेअर्सचे ४१ कोटी परत देण्याचा सेबीचा आदेश

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखान्याच्या (Sugar Factory) उभारणीसाठी शेअर्सपोटी जमा केलेले सुमारे पाच हजार ठेवीदारांचे १७ कोटी व त्यावरील व्याज असे एकूण जवळपास ४१ कोटी रुपये येत्या ५ जानेवारीपर्यंत परत द्यावेत, असा आदेश सेबीने (SEBI) दिला आहे, अशी माहिती तक्रारदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी पंढरपूर तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी आज (ता. २ डिसेंबर) पत्रकार परिषदेत दिली. (SEBI orders return of Rs 41 crore shares of Sitaram Sugar factory)

दरम्यान, सेबीच्या आदेशामुळे पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. हा राष्ट्रवादीची नेते कल्याणराव काळे (Kalyanrao kale) यांना मोठा दणका मानला जात आहे. चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तोंडावर असताना हे नवेच संकट काळे यांच्यासमोर उभे ठाकले आहे, त्यामुळे काळेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

कल्याणराव काळे यांनी सीताराम महाराज साखर कारखाना सुरु करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शेअर्सच्या रुपाने ठेवी गोळा केल्या आहेत. कारखाना सुरु झाल्यानंतरही ठेवीदारांना पुरेशा लाभ मिळाला नाही, त्यामुळे ठेवीदारांनी शेअर्स पोटी भरलेली रक्कम परत मिळावी, अशी लेखी तक्रार दीपक पवार यांनी इन्कटॅक्स, सेबीकडे केली होती. त्यावर सेबीने येत्या ५ जानेवारीपर्यंत तक्रारदार ठेवीदारांना त्यांचे व्याजासह पैसे परत द्यावेत ; अन्यथा कारखान्याच्या तत्कालीन व सध्याच्या संचालकांच्या संपत्तीवर टाच आणली जाईल, असा आदेश दिला आहे.

ॲड. दीपक पवार या संदर्भात म्हणाले की, मागील काही वर्षांपासून सीताराम महाराज साखर कारखान्याला शेअर्स म्हणून भरलेले पैसे परत मिळावेत, यासाठी पाठपुरावा सुरु आहे. कारखान्याचे तत्कालीन मुख्य प्रवर्तक कल्याणराव काळे व त्यांच्या संचालकांकडेही वारंवार मागणी केली. परंतु पैसे परत मिळालेले नाहीत, त्यामुळे सेबीकडे लेखी तक्रार केली होती.

सेबीने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देत, येत्या ५ जानेवारीपर्यंत वार्षिक १५ टक्के व्याजदराने पैसे परत देण्याचे आदेश कारखान्याचे तत्कालीन संचालकांना दिले आहेत. सेबीच्या आदेशामुळे कारखान्याचे तत्कालीन व विद्यमान संचालक मंडळाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT