Gokul Chairman Election; Chandrakant Patil And Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil : ‘मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर एका दिवसांत..!‘, चंद्रकांत पाटलांनी काही तासांत हिशेब चुकता केला, सतेज पाटलांवर जोरदार प्रहार

Chandrakant Patil Warns Satej Patil Over Gokul Chairman Election : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नादाला लागू नका असाही इशारा दिला आहे.

Aslam Shanedivan

Kolhapur News : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तेल लावलेले पैलवान आहेत. त्यांच्या नादाला लागू नका, असा इशारा देतानाच फडणवीस यांनी ठरवले तर एका दिवसात तुमचे साम्राज्य उद्ध्वस्त होईल, असे आक्रमक विधान चंद्रकांत पाटील यांनी केले.

गोकुळच्या सत्तासंघर्षावरून बोलताना चंद्रकांत पाटील यांनी २०१९ मधील सत्तास्थापनेचा संदर्भ देत सतेज पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावेळी भाजप आणि महायुतीला जनादेश मिळालेला असतानाही सतेज पाटील यांनी शरद पवार यांच्या मदतीने राजकीय घडामोडी घडवून आणल्या, असा दावा त्यांनी केला.

काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले नाही, तर स्वतंत्र गट तयार करण्याची धमकी देण्यात आली होती, असा आरोपही त्यांनी केला. या संदर्भातील फोन कॉल आणि व्हिडिओ कॉलची नोंद आपल्याकडे असल्याचा दावा करत, वेळ आल्यास कॉल रेकॉर्डसह माहिती देण्यास तयार असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

आणीबाणीच्या काळातील घटनांचा दाखला देत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. आणीबाणीच्या काळात आपल्या घरातील चार जण १९ महिने तुरुंगात होते. आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या पत्नीने जेवणाचे डबे पोहोचवले होते, असे सांगत त्यांनी इंदिरा गांधी यांच्या कारभारावर टीका केली. लोकशाही आणि संविधानाबाबत सतेज पाटील यांनी आपल्याला शिकवू नये, अशा शब्दांत त्यांनी सुनावले.

यावेळी त्यांनी डी. वाय. पाटील कुटुंबाच्या संपत्तीवरूनही सतेज पाटील यांना लक्ष्य केले. डी. वाय. पाटील यांच्या काळातील परिस्थितीचा उल्लेख करत सतेज पाटील यांनी आपली संपत्ती जाहीर करावी आणि ती कुठून आली, याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. गोकुळ दूध संघाला डी. वाय. पाटील यांच्या नावाऐवजी ‘बंटी पाटील’ यांचे नाव देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. कुटुंबातील इतरांपेक्षा अधिक श्रीमंत होण्याचे आणि मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न सतेज पाटील पाहत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सतेज पाटील एका बाजूला त्यांच्यावर बोलतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडेच कामे घेऊन जातात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. फडणवीस यांच्याकडे कामे घेऊन जायचे नसेल, तर राहुल गांधी यांच्याकडून कामे करून घ्यावीत, असे आव्हानही त्यांनी दिले. शिक्षणमंत्री म्हणून फडणवीस यांनी आदेश दिल्यास संबंधितांचे साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होऊ शकते, असे विधानही त्यांनी केले.

गोकुळमधील राजकीय संघर्षावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या संयमाचा उल्लेख केला. गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू असतानाही मुख्यमंत्री शांत होते. मात्र, नागपूरमध्ये त्यांनी एकदा भूमिका मांडल्यानंतर विरोधकांची बोलती बंद झाली, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नादाला लागू नका, असा इशारा देतानाच ‘मुंगी होऊन साखर खायची असते,’ असे म्हणत त्यांनी सतेज पाटील यांना टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT