

Kolhapur News : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीकडून माजी आमदार राजेश पाटील यांची निवड झाली. या निवडीवरून समविचारी आघाडी आणि महाविकास आघाडीकडून टीका होत असतानाच चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मात्र राजेश पाटील यांचे स्वागत केले आहे.
विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या या दोन्ही नेत्यांमध्ये गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने संघर्षही पाहायला मिळाला होता. मात्र, गोकुळचे अध्यक्षपद चंदगडला मिळाल्याचा आनंद व्यक्त करत शिवाजीराव पाटील यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत.
गोकुळ दूध संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून आमदार शिवाजीराव पाटील यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांविरोधातच भूमिका घेतली होती. चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तीन तालुक्यांना गोकुळमध्ये योग्य प्रतिनिधित्व आणि न्याय मिळावा, अशी त्यांची मागणी होती. या तालुक्यांचे दूध उत्पादन आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचे योगदान मोठे असतानाही गेल्या ३५ वर्षांत त्यांना अपेक्षित न्याय मिळाला नसल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.
मुश्रीफांच्या भूमिकेलाही केला होता विरोध
गोकुळच्या निवडणुकीदरम्यान वाढीव सभासदांचा मुद्दा असो किंवा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका, आमदार शिवाजीराव पाटील यांनी सातत्याने टीका केली होती. चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांना गोकुळच्या माध्यमातून न्याय मिळावा, यासाठी त्यांनी महायुतीच्या नेत्यांकडे आग्रह धरला होता.
इतकेच नव्हे, तर विधानसभा निवडणुकीत आपले कट्टर विरोधक असलेल्या माजी आमदार राजेश पाटील यांना गोकुळच्या निवडणुकीत एकत्र येऊन लढण्याची विनंतीही शिवाजीराव पाटील यांनी केली होती. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या अनेक बैठका पार पडल्या; मात्र या बैठकांना आमदार पाटील यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दापुढे जाणार नसल्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली होती.
राजकीय विरोधकाला शुभेच्छा; चंदगडला अध्यक्षपद मिळाल्याचा आनंद
अखेर गोकुळच्या अध्यक्षपदी माजी आमदार राजेश पाटील यांची निवड झाल्यानंतर आमदार शिवाजीराव पाटील यांनी सरकारनामाशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "गोकुळसारख्या संस्थांमध्ये चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुके नेहमीच वंचित राहिले आहेत. या तिन्ही तालुक्यांना न्याय मिळावा, ही माझी भूमिका होती. माजी आमदार राजेश पाटील हे विधानसभा निवडणुकीतील आमचे विरोधक असले, तरी गोकुळचे अध्यक्षपद चंदगडला मिळाले, याचा मला आनंद आहे. त्यांना अध्यक्षपद मिळाल्याबद्दल शुभेच्छा देतो. दूध उत्पादक शेतकरी आणि सभासदांना त्यांनी प्रामाणिकपणे न्याय द्यावा, हीच अपेक्षा आहे."
गोकुळच्या सत्तासंघर्षात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवाजीराव पाटील यांनी आता राजेश पाटील यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. त्यामुळे राजकीय विरोध बाजूला ठेवून चंदगडच्या प्रतिनिधित्वाला त्यांनी प्राधान्य दिल्याचे या प्रतिक्रियेतून स्पष्ट होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.