BJP leader Chandrarao Taware declares full-force entry into Malegaon Sugar Factory elections to challenge Ajit Pawar’s dominance in Baramati. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Baramati Politics : त्यावेळी फडणवीस यांनी सांगितलं म्हणून... पण आता गप्प बसणार नाही; तावरेंचाही अजितदादांविरोधात शड्डू!

Baramati Politics : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने शांत बसलो. पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार असल्याचे भाजप नेते चंद्रराव तावरे यांनी सांगितले.

Hrishikesh Nalagune

Baramati Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली. त्यामुळे फडणवीस साहेबांनी आम्हाला सूचना केली आणि आम्ही प्रामाणिकपणे अजित पवार यांची मदत केली. असे असताना ते आमच्यावर टीका करतात. त्यामुळे आता 'माळेगाव'च्या निवडणुकीत आम्हीसुद्धा त्यांना सडेतोड उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा देत भाजप नेते चंद्रराव तावरे यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी गुरुवारी (22 मे) पदाधिकाऱ्यंच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात अजित पवार यांनी स्वतंत्र पॅनेलमधून लढण्याचा मनसुबा जाहीर केला. यावेळी त्यांनी त्यांचे कट्टर स्थानिक विरोधक आणि भाजप नेते चंद्रराव तावरे यांच्यावर टीकाही केली. त्यानंतर लगेचच तावरे यांनीही पत्रकार परिषद घेत निवडणुकीला मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जाणार असल्याचे सांगितले,

चंद्रराव तावरे म्हणाले, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली माळेगाव, सोमेश्वर व छत्रपती कारखाना प्रशासनाने मागील ऊस गळीत हंगामात पहिला अॅडव्हान्स 2800 रुपये एकसारखा दिला. त्या धोरणामुळे 'माळेगाव'ला सुमारे एक लाख टन गेटकेन ऊस मिळाला नाही. गेटकेन ऊस संपल्यावर 'माळेगाव'च्या सत्ताधाऱ्यांनी 3132 रुपये प्रतिटन सभासदांना देऊ केले. या चुकीच्या धोरणामुळे कारखान्याचे पर्यायाने सभासदांचे आर्थिक नुकसान झाले. अशा अनेक गोष्टी आम्ही सडेतोडपणे पुढे मांडणार आहोत.

सभासदांना न्याय मिळणार नसेल, तर आम्ही समोरच्यांसोबत तडजोड कशासाठी करायची? चेअरमन होण्यास काय अर्थ आहे? मागील निवडणुकीत नीरा नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडविणार म्हणून मते घेऊन सत्तेत आले. गेली पाच वर्षात अद्याप हा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी खराब होत असताना ते प्रदूषित पाण्याचा बंदोबस्त का करू शकले नाहीत? असा सवाल करत तावरे यांनी अजित पवार यांना मते मागण्याचा अधिकार नाही, अशीटी टीका केली.

कारखान्यात राजकारण नको :

अजित पवार यांनी प्रचार शुभारंभाच्या सभेत अध्यक्षांचे नाव जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे. यावर तावरे म्हणाले, "लोकशाहीमध्ये असे चालते का? निवडणुकीच्या अगोदर अध्यक्षांचे नाव जाहीर करणे म्हणजे 20 हजार सभासदांना किती गृहित धरतात, तालुक्यात विकास केला म्हणता, रस्ते, दिवाबत्ती, पाण्याच्या सुविधा करणे, हे लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे कामच आहे, असा टोलाही तावरे यांनी लगावला.

साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचा प्रपंच अवलंबून आहे. येथे राजकारण नको. वाडवडिलांनी हा कारखाना उभा करताना मोठे कष्ट घेतले. त्याकाळी पैशाची गुंतवणूक केली आणि तो कारखाना तुमच्या आमच्या हातात दिला. त्यामुळे कारखाना सुस्थितीत ठेवण्यासाठी आम्ही लढाईत उतरलो आहे. त्यामुळे आम्ही अनेक वर्षे चेअरमनपद भूषविल्याने आता त्या पदाची कसलीही अपेक्षा नाही, असेही तावरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT