
Ajit Pawar News : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कट्टर विरोधक आणि स्थानिक भाजप नेते चंद्रराव तावरे यांच्याशी युती होण्याच्या सर्व शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावल्या आहेत. याउलट थेटपणे आणि ताकदीने निवडणूक लढविण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा बारामतीमध्ये पवार विरुद्ध तावरे असा पारंपारिक संघर्ष पाहायला मिळणार आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी गुरुवारी (22 मे) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार बोलत होते. गतवर्षी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे पवार आणि तावरे स्थानिक राजकारणातही जुळवून घेतील, अशा चर्चा होत्या. या मेळाव्यात ते चंद्रराव तावरे यांच्यासोबत आघाडी करतील अशी शक्यता होती. पण अजित पवार यांनी आघाडीच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
यावेळी अजित पवार यांनी नामोल्लेख टाळत तावरे यांच्यावरही जोरदार टीका केली. "ते हट्टी असतील तर मीही डबल हट्टी आहे. आपल्या वयाचा विचार करून नवीन युवकांना संधी द्यायला हवी. इतकी वर्षे तुम्ही काम केलेलेच आहे, आता नव्या चेहऱ्यांनाही काम करू द्यायला हवे. यांना कारखान्याविषयी खरच आपुलकी असती तर काही जण अडीच वर्षे आणि काही जण 5 वर्षे बोर्ड मिटींगला फिरकलेही नाहीत. असे का घडले? असा सवालही त्यांनी केला.
यानंतर तावरे यांनीही अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली. त्यामुळे फडणवीस साहेबांनी आम्हाला सूचना केली आणि आम्ही प्रामाणिकपणे अजित पवार यांना मदत केली. असे असताना ते आमच्यावर टीका करतात. त्यामुळे आता 'माळेगाव'च्या निवडणुकीत आम्हीसुद्धा त्यांना सडेतोड उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.