Chandrashekhar Bawankule On Congress :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bawankule On Congress : बावनकुळे म्हणतात, 'काँग्रेस भ्रष्टाचारी पण मोदींवर दहा वर्षांत एकही डाग...'

Chandrashekhar Bawankule On Congress : "150 देशांनी मोदींना आदर्श नेते मानले आहे. मोदी जगभरात लोकप्रिय नेते आहेत...."

Anil Kadam

Sangli News : काँग्रेस सत्तेच्या काळात भ्रष्टाचाराने कहर केला होता. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्ताकाळात एकही डाग लागला नाही. मोदींनी समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. म्हणून 150 देशांनी मोदींना आदर्श नेते मानले आहे. मोदी जगभरात लोकप्रिय नेते आहेत. भविष्यातील विकसित भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सक्षम पर्याय आहेत, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. (Latest Marathi News)

शिराळा येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बोलत होते. या वेळी कामगारमंत्री सुरेश खाडे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, सम्राट महाडिक उपस्थित होते. या प्रसंगी भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही करण्यात आल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, दहा वर्षांच्या मोदींच्या सत्ताकाळात त्यांनी समाजातील प्रत्येक घटक विकासाच्या प्रवाहात आणला. म्हणून 150 देशांनी मोदींना आदर्श व लोकप्रिय नेते आहेत, असे मान्य केले आहे. कोरोना काळात त्यांनी देशातील प्रत्येकाला मोफत लस देण्याचे काम केले. सीमेवरील सैनिकांसोबत दिवाळी करणारे ते एकमेव पंतप्रधान आहेत. ते म्हणाले, रामजन्मभूमीबाबत काँग्रेसने कोर्टात प्रतिज्ञापत्र दिले की, रामजन्म काल्पनिक आहे. 527 वर्षे तंबूतले रामलल्ला मंदिरात विराजमान झाले. त्यासाठी नरेंद्र मोदींना यावे लागले.

काश्मीरला विशेष दर्जा, दुसरे संविधान देऊन काँग्रेसने भारत तोडण्याचे काम केले. मोदींनी 370 कलम हटवले आणि देश जोडला. काश्मीर आपले झाले. काँग्रेसने सत्ताकाळात देशातल्या लोकांना गरीबच ठेवले. लोकसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण दिले. काँग्रेसने कधीच सर्वसामान्यांचे हित पाहिले नाही. संधी मिळेल तिथे केवळ भ्रष्टाचारच केला. त्या भ्रष्टाचाराची ईडीकडून चौकशी झाली तर भाजपचे नाव पुढे केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शिराळ्यातील वाकुर्डे बुद्रुक योजना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक वाढवण्यात आले आहे. त्यामुळेच योजना पूर्ण होऊ शकत नाही. मात्र, भाजप सरकार वाकुर्डे बुद्रुक योजना निश्चित पूर्ण करेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री खाडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यामुळे देशातील प्रत्येक घराघरांत सोयीसुविधा पोहोचल्या आहेत. काँग्रेसच्या राजवटीत जनता पिळली गेली होती. भाजप सरकार काळात त्यांचा खऱ्याअर्थाने विकास झाला. त्यामुळे पुन्हा भाजपचे सरकार येणार हे निश्चित आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख म्हणाले, शिराळा मतदारसंघात संघटना सशक्त करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात कार्यकर्त्यांना अनेक अडचणी आल्या. शिवाजीराव देशमुख यांचे दिमाखदार स्मारक व्हावे, अशी तालुक्याची अपेक्षा आहे.

(Edited By - Cheta Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT