लोकसभा निवडणुकीत प्रचारात आघाडीत राहिलेले गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी माघार घेत शाहू महाराज छत्रपती यांच्या विजयात मोठा हातभार लावला. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील आणि चेतन नरके यांच्या चर्चेनुसार ही आघाडी लोकसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरली. आता हीच आघाडी करवीर विधानसभा मतदारसंघात महायुतीला घाम फोडणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आमदार सतेज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि गोकुळचे संचालक चेतन नरके हे आगामी निवडणूक काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालीच सामोरे जाणार आहेत.
त्याबाबत एक मत झाले असून दोन दिवसांपूर्वी या तिघांच्यातच चर्चा झाली आहे. एकेकाळी याच कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक, नरके आणि पाटील यांच्या आघाडीने राज्य केले. पण आता काळाच्या ओघात या आघाडीने बदलाचे स्वरूप प्राप्त केले असून नरके पाटील असे आघाडीने रूप घेतले आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे गणित बिघडवणार हे नक्की.
मागील 30 ते 35 वर्षाचे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय चित्र पाहता माजी आमदार महादेवराव महाडिक, गोकुळची माजी अरुण नरके, आणि काँग्रेसचे दिवंगत आमदार पी एन पाटील (P N Patil) अशी तिघांची मिळून 'मनपा' आघाडीने कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय दबदबा तयार केला होता. कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर जिल्हा बँक, गोकुळ यासह इतर सहकारी संस्थावर या तिघांच्या आघाडीने पकड निर्माण केली होती. आता ह्याच आघाडीने बदलते स्वरूप घेतले असून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, गोकुळचे संचालक चेतन नरके आणि दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांची करवीर विधानसभा (Karveer Vidhansabha) निवडणुकीच्या अनुषंगाने आघाडी निर्माण झाली आहे. हीच आघाडी करवीर मधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे
लोकसभा निवडणुकीत चेतन नरके यांनी माघार घेतल्यानंतर त्याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना झाला. हीच रणनीती आता करवीर विधानसभा निवडणुकीत वापरली जाणार आहे. इतकेच नव्हे तर नरके यांच्या पाठिंब्यामुळे सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीसाठी दोन डाव टाकले आहेत. नरके यांना आपल्या नेतृत्वाखाली घेऊन करवीर विधानसभा आणि पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकत वाढवली आहे. नरके यांची करवीर मतदारसंघात असलेली पकड आणि पन्हाळा- शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात असणारा प्रभाव हा महाविकास आघाडीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
करवीरमध्ये राहुल पाटील (Rahul Patil) यांना नरके यांची मदत होऊ शकते तर पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना मदत होऊ शकते. दरम्यान सतेज पाटील यांच्या या डावामुळे दोन्ही मतदारसंघातील महाविकास आघाडीचा बराचसा डाव सोपा झाला आहे. शिवाय चेतन नरके यांना पुढील लोकसभा निवडणुकीसाठी संधी मिळू शकते अथवा गोकुळ दूध संघात महत्त्वाच्या पदावर संधी मिळू शकते. अशी ही शक्यता नाकारता येत नाही.
महाविकास आघाडीसाठी नरके - पाटील आणि पाटील एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे करवीर विधानसभा मतदारसंघात 'नपापा पॅटर्न'ची आता पासूनच चर्चा आहे. तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार चंद्रदीप नरके असू शकतात. गोकुळचे संचालक चेतन नरके आणि चंद्रदीप नरके हे चुलत बंधू आहेत. मात्र चेतन नरके यांनी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना चंद्रदीप नरके यांच्या विरोधात काम करावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.