Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

छगन भुजबळ खरंच मुख्यमंत्री बनले असते?

प्रकाश पाटील

अहमदनगर : शिवसेनेसह अनेक पक्षात असे नेते आहेत की त्यांचे मुख्यमंत्र्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. अजित पवार, जयंत पाटील असतील किंवा नाथाभाऊ खडसे असतील किंवा अन्य ज्येष्ठ नेते असतील. प्रत्येकाला मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा असते.पण, राजकारणात काहीही सांगता येत नाही किंवा अंदाजही बांधता येत नाही. कोणाच्या नशीबात काय हे कसं सांगता येईल. भुजबळ शिवसेनेत असते तर ते मुख्यमंत्री बनले असते ! हे नाही तरी कसं म्हणावं! Chhagan Bhujbal would have really become the Chief Minister?

मी जर शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री बनलो असतो असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. खरंतर राजकारणात निष्ठेने एकाच पक्षात आयुष्य खर्ची केलेले नेते महाराष्ट्राने पाहिले आहेत. पक्षाचा झेंडा कधीही खाली ठेवून दुसरा झेंडा खांद्यावर घेतला असे कधी होत नाही. मात्र तो एक काळ होता. तसे आदर्शवादी नेते होते. याचा अर्थ सध्याचे सगळेच नेते पक्ष बदलू आहेत असे नव्हे.

आज कोणताही पक्ष घ्या तो पक्ष जोपर्यंत नेत्यांना पदप्रतिष्ठा देतो तोपर्यंत ते त्या पक्षाचा जयघोष करीत असतो. पक्षाने थोडं बाजूला केलं किंवा पद काढून घेतलं की त्यांची नाराजी सुरू होते. पक्ष कसा अन्याय करतो, मी पक्षासाठी काय काय केले! कसे रक्त आठवले, हे सांगत असतो. पक्ष किंवा पक्षाचा अध्यक्ष मागे असतो म्हणून आपणास किंमत आहे, हे ते विसरत असतो. नेते मोठे होतात ते मुळात पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या जिवावर. हे कदापि नाकारता येणार नाही. नेता पक्षवाढीसाठी काय करतो हे पाहून त्याला पद मिळतात हे ही तितकंच खरं.

छगन भुजबळ ही शिवसेनेची एककाळची मुलुखमैदानी तोफ होती हे नाकारता येणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षात जे काही वजनदार नेते होते त्यामध्ये त्यांचा नंबर लागायचा. अर्थात ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि इतरजणही होतेच. परंतु भुजबळांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेचे मैदान गाजविले हे ही तितकंच खरं. राज्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते करण्याची वेळ आली तेव्हा मनोहर जोशी यांचे नाव पुढे आले. भुजबळ मागे पडले होते. अर्थात नाराजी होतीच. पुढे तर त्यांनी शिवसेनेला `जय महाराष्ट्र` करून थेट कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयाने शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. बाळासाहेबांनी भुजबळांना थेट शिंगावर घेत त्यांना `लखोबा लोखंडे`ची पदवी दिली. भुजबळांनीही बाळासाहेबांवर टीका केली. त्यावेळी बरेच रामायण घडलं. हा सारा इतिहास आहे.

पुढे राज्यात शिवसेनेची सत्ता (1995) आली आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. जोशी पायउतार झाल्यानंतर नारायण राणे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेचे दोनवेळा मुख्यमंत्री बनले त्यावेळीही लोक सहज म्हणायचे, "छगन भुजबळ शिवसेनेत असते तर !'' तर ते मुख्यमंत्री बनले असते. लोकांच्या भावना समजून घेण्यासारख्या असल्या तरी भुजबळ मुख्यमंत्री बनलेच असते, असे कसे सांगता येईल. राणे जेव्हा मुख्यमंत्री बनले तेव्हा पक्षात सुधीरभाऊ जोशी, सुभाष देसाई यांच्या सारखे नेते अतिविश्वासू होते. त्यांना डावलून राणे मुख्यमंत्री बनले. याचा अर्थ भुजबळ झालेही असते मुख्यमंत्री किंवा नाहीही हे आज काही सांगता येत नाही. मुख्यमंत्री कोणाला करायचे याचा सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुखच घेत असतात. त्यामागची गणितही असतात. शिवसेनेतील जुने जाणते कार्यकर्ते आजही म्हणतात, की सुधीरभाऊ मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. तसे मात्र झाले का?

शेवटी राजकारणाचा खेळ निराळा असतो. काँग्रेसकडे पाहाना. आजपर्यंत किती मुख्यमंत्री बनले आणि गेले! दिल्लीहून चिठ्ठी आली की एका क्षणात जो कोणी मुख्यमंत्री असेल त्याला पायउतार व्हावे लागायचे. प्रत्येक पक्षात सत्तास्पर्धा असतेच. ऐनवेळी कोणाचे नाव पुढे येईल हे सांगता येत नाही. या खेळात यशस्वी होण तसं सोपही नाही. राहिला प्रश्‍न भुजबळांचा. त्यांची भाषण, त्यांचा आवेश, आक्रमकपणा किंवा महाराष्ट्र पिंजून काढण्याची त्यांच्यामध्ये धमक होती. शिवसेनेत ते खऱ्या अर्थाने हिरो होते. राज्यातील जनतेला वाटत होते, की भुजबळ शिवसेनेचे मुख्यमंत्री बनले पाहिजेत म्हणून ! मात्र तसे झाले नाही. ते काँग्रेसमध्ये गेले, त्यानंतर राष्ट्रवादीत आले. अनेक चढउतार त्यांनी पाहिले. अनेक वर्षे मंत्री राहिले. त्यांच्यासारखे सर्वच पक्षात अनेक नेते असे आहेत की तेही मंत्री आहेत. पण अनेकांचे मुख्यमंत्र्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. भाजपमध्ये नाथाभाऊ खडसेंचे नावही असेच मागे पडले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. त्यामुळे राजकारणात काहीही सांगता येत नाही किंवा अंदाजही बांधता येत नाही. कोणाच्या नशीबात काय हे कसे सांगता येईल. भुजबळ शिवसेनेत असते तर मुख्यमंत्री खरंचा बनले असते का ! त्यांनी पक्ष सोडला नसता तर ते मुख्यमंत्री बनलेही असते नाही तरी कसे म्हणावे !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT