Phaltan, 25 August : राज्यातील प्रमुख सहकारी साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत, असा खळबळजनक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. त्यांच्या आरोपामुळे फलटण तालुक्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. श्रीराम कारखान्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी हे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मदतीला धावून आल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, सहकारी साखर कारखाने अडचणीत असताना खासगी साखर कारखान्यांना प्रोत्साहन दिले जात आहे का?,असा सवाल करत सहकार क्षेत्राच्या भवितव्याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाच हा श्रीराम कारखाना बंद करायचा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. श्रीराम कारखाना सुरू करण्यासाठी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी गरज पडल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला. शेतकरी आणि सभासदांच्या हिताचा विचार करून कारखाना सुरू करण्यासाठी सरकारने आवश्यक ती मदत करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
श्रीराम कारखाना हा केवळ साखर उत्पादनाचा प्रकल्प नसून तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूकदार तसेच कारखान्यावर अवलंबून असलेल्या विविध व्यावसायिकांच्या आर्थिक जीवनाशी जोडलेला आहे. कारखाना सुरू झाल्यास ऊस उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळण्याबरोबरच वाहतूक, मजुरी, व्यापार आणि अन्य पूरक व्यवसायांना चालना मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत श्रीराम कारखाना सुरू झाला पाहिजे, अशी भूमिका सभासद, शेतकरी आणि कारखान्याशी संबंधित घटकांकडून होणे आवश्यक आहे.
कारखाना बंद राहिल्यास त्याचा परिणाम तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले. शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने श्रीराम कारखान्याचा प्रश्न आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या आरोपांवर सरकार काय भूमिका मांडते आणि कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखाना सहकारी तत्त्वावर पुन्हा सुरू करण्यासाठी सुमारे १७ कोटी रुपयांच्या भांडवलाची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आहे. कारखाना सुरू करण्यासाठी सभासदांनी पुढाकार घ्यावा, या उद्देशाने रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आवाहनानंतर सभासदांकडून प्रत्येकी १५ हजार रुपयांचे शेअर्स जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अपेक्षित भांडवल अद्याप पूर्णपणे जमा झालेले नसल्याने कारखाना प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
रामराजे-रणजितसिंहांमध्ये आरोप-प्रत्यारोप
श्रीराम कारखान्याच्या प्रश्नावरून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात गेल्या काही काळापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कारखाना अडचणीत येण्याची कारणे, त्याच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक उपाययोजना आणि त्यासाठीची जबाबदारी यावरून फलटणचे राजकारण तापले आहे.
'रर्स्तेमार्गाने साखर नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानात गेली'
साखर दरवाढीसंदर्भात राजू शेट्टी म्हणाले, सरकारकडे दीड महिना पुरेल एवढी साखर आहे. तसेच, दक्षिणेकडील कारखाने 15 सप्टेंबरला सुरू होत असताना साखरेची एवढी अनैसर्गिक दरवाढ होण्याचे कारणच काय? केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार सुमारे 57 लाख टन साखर शिल्लक राहते, मग ही साखर गेली कुठे? असा सवाल करून शेजारील नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान या देशात साखरेचे दर गगनाला भिडलेले होते. त्यामुळे रर्स्तेमार्गाने ही साखर बाहेरील देशांत चोरून गेलेली आहे, असा आरोप त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.