Solapur, 24 September (संदीप गायकवाड) : सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी भीषण दुष्काळी परिस्थिती ओढावली आहे. जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात ७० पेक्षा जास्त पाण्याचे टॅंकर सुरू असून खरीप हंगाम पूर्णपणे हातचा गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्यात दुष्काळी पाहणी दौरा केला. यात बार्शीतील धानोऱ्यात १८ मिनिटे, तर उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंब्यात अवघ्या १४ मिनिटांत दुष्काळी पाहणी दौरा आटोपला. या दौऱ्यात शेतकरी कमी आणि पदाधिकाऱ्यांचा भरणा अधिक होता, त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचू शकल्या नाहीत, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरआधी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. धाराशिवमधून मुख्यमंत्री बार्शी तालुक्यातील धानोरे येथे आले. धानोरे येथे ३.०२ मिनिटांनी मुख्यमंत्री आले, तर ३.२० मिनिटांनी गेले. वृद्ध महिला दमयंती साहेबराव गादेकर यांच्या सुमारे ५ हेक्टर क्षेत्रातील करपलेल्या सोयाबीनची पाहणी केली.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राम सातपुते, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, धाराशिवच्या जि. प. अध्यक्षा अर्चना पाटील, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार एफ. आर. शेख, कृषी अधिकारी संतोष कोयले आदी उपस्थित होते.
बार्शीनंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे मुख्यमंत्र्यांचे ४.३६ मिनिटांनी आगमन झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारंबा येथील शेतकरी अशोक भोरे यांच्या शेतातील सोयाबीनची पाहणी केली. पाहणीनंतर ४.५० मिनिटांनी मुख्यमंत्री निघून गेले.
या पाहणीवेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, देवेंद्र कोठे, राजू खरे हे आमदार, तर बाजार समितीचे सभापती माजी आमदार दिलीप माने, भाजप नेते शहाजी पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी आमदार नरसिंग मेंगजी, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक अमर पुदाले, सभापती तेजस्विनी बोराडे, पंचायत समिती सदस्या सुनिता बारस्कर, विनायक सुतार , जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, तहसीलदार निलेश पाटील यांच्यासह सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
सरसकट मदतीचा प्रयत्न
कायद्यानुसार सरकारला पंचानामे करावे लागतात. तरीदेखील परिस्थिती ही सरसकट नुकसानीची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भेदभाव न करता सरसकट मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आमदार राजू खरे अचानक अवतरले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कारंबा येथे पाहणी करण्यासाठी उतरले असता मोहोळ-उत्तर सोलापूर मतदारसंघाचे आमदार राजू खरे हे दाखल झाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत उजनीचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याबाबत विनंती केली. उत्तरमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती असताना आमदार राजू खरे एकदाही शेतकऱ्याच्या बांधावर आले नाहीत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी अचानक अवतरले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.