Agriculture Exhibition  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Agriculture Exhibition : ...म्हणून कराडचे कृषी प्रदर्शन यशस्वी होऊनही राजकीय चर्चांना उधाण!

Mayur Ratnaparkhe

विशाल वामनराव पाटील -

Karad News : यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून कराड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व शासनाच्या सहकार्याने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन दरवर्षी भरवण्यात येते. यंदाचे कृषी प्रदर्शन प्रचंड प्रतिसादासह यशस्वीरित्या पद्धतीने पार पडले. या प्रदर्शनाला जवळपास १० लाखांहून अधिक लोकांनी भेट दिल्याचे ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी सांगितले आहे.

मात्र, आता या प्रदर्शनास भेट देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न आल्याने आणि दिवंगत विलासराव पाटील- उंडाळकर यांच्यानंतरही सर्वपक्षीयांनी हजेरी लावल्याने विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

कराड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार होते. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री यांचा दौरा रद्द झाला. दौरा रद्द झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले ते अद्याप थांबलेलं नाही. कारण, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री आजारी असल्याच्या कारणाने आले नसल्याची माहिती दिली होती. परंतु मुख्यमंत्री न येण्यामागे वेगळेच राजकीय कारण असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर दुसरीकडे कराड कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसच्या विचारांची सत्ता असताना सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी प्रदर्शनाला हजेरी लावली. प्रदर्शनाचे उद्घाटन सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील, अजित पवार गटाचे आणि सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी हजेरी लावली होती. दिवंगत विलासराव पाटील - उंडाळकर यांच्यानंतरही बाजार समितीत सर्वपक्षीयांना ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी एकत्रित आणत विरोधकांना ताकद दाखवून दिली, असल्याचं बोललं जात आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणितं पाहता काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत दिसून आली आहे. काँग्रेसच्या काका- बाबा गटाविरोधात भाजपचे डॉ. अतुल भोसले यांचा गट लढत असतो. गेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे डॉ. अतुल भोसले यांनी एकत्रित येत काँग्रेसच्या काका- बाबा गटासह उत्तरेतील भाजपला विरोध केला होता.

यामुळेच कृषी उत्पन्न बाजार समितीत मुख्यमंत्री यांनी कार्यक्रमाला हजेरी लावणे म्हणजे एकप्रकारे काँग्रेसच्या लोकांना सहकार्य आणि भाजपला दूर लोटण्यासारखा प्रकार होणार होता.

कराड दक्षिण मधील भाजपचे विधानसभा उमेदवार डॉ. अतुल भोसले विरोधक असल्याने प्रदर्शनाला येणार नव्हते, हे गृहीत होते. मात्र, शरद पवार गटाचे आणि महाविकास आघाडी घटक पक्षातील आमदार बाळासाहेब पाटील यांनीही पाठ फिरवली याचे कारण म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सातारा जिल्हा बँकेची निवडणूक आहे. डॉ. अतुल भोसले आणि आमदार बाळासाहेब पाटील यांनी एकत्रित येत काँग्रेसच्या काका- बाबा गटा विरोधात निवडणूक लढली होती.

तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असल्याने येऊ न शकल्याचे सांगितले असले, तरी कारण वेगळेच असल्याची चर्चा आजही सुरू आहे. कारण, या अगोदरच्या कराड दौऱ्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यावेळी त्यांनी भेदा चौकातील छत्रपती शंभूतीर्थाचे भूमिपूजन केले आणि प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह याचेही उद्घाटन केले होते.

या वेळी शासकीय दौऱ्यात कराड दक्षिण मतदारसंघातील कापील येथील पुलाचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार होते. परंतु, माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून या पुलाला निधी मंजूर झाल्याने मुख्यमंत्र्यांना त्या उद्घाटनास जाण्यासाठी राजकीय खेळीतून थांबवण्यात आल्याची चर्चा रंगली होती. तशीच चर्चा आजही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री न आल्याने सुरू आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT