Mumbai Political News : अजित पवारांनी पक्ष सोडल्यानंतर तेथील अनेक नेते त्यांची जागा घेण्यासाठी उतावळे झालेले आहेत. ते आता पक्ष सोडला म्हणून टीका करत आहेत. मात्र, गेल्या निवडणुकीत तेच भाजपच्या तिकिटावर आमदारकीचे स्वप्न पाहत होते. तसेच सरकारमध्ये स्थान दिले नाही म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देणार होते, असा गौप्यस्फोट करत कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी आमदार रोहित पवारांची कोंडी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे रायगडमधील कर्जत येथे गुरुवारी वैचारिक मंथन शिबिर पार पडले. या वेळी धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि रोहित पवारांवर निशाणा साधत आपल्या स्टाइलमध्ये समाचार घेतला. संबंधितांना कडक शब्दांत सुनावत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार असल्याचे ठणकावून सांगितले. यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील वाद चिघळण्याची शक्यता आहे.
मुंडे म्हणाले, 'त्या पक्षात काही जण एवढे उतावळे झाले आहेत, की त्यांना दादांची जागा घेतल्याचा भास होऊ लागला आहे. आता त्यांच्याही काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूक एकत्रित राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्याएेवजी हडपसरमधून भाजपच्या उमेदवारीसाठी कुठल्या खासदाराकडून प्रयत्न सुरू होते. तसेच २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जागा मिळाली नाही म्हणून राजीनामा देऊन पुन्हा कर्जत जामखेडमध्ये भाजपकडून उभे राहणारेच आता दादांवर आरोप करत सुटले आहेत.'
राष्ट्रवादी सोडल्यानंतर अजितदादांनी पक्षासाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पक्ष स्थापनेपासून ३० वर्षे हा मानून पक्षवाढीसाठी झटत होता, याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल. मला परळीमधून आणले, मावळातील सुनील शेळकेंना कुणी आणले ? नवीन माणसांना काम देऊन पक्षवाढीसाठी दादांनीच प्रयत्न केले, याकडेही धनंजय मुंडेंनी लक्ष वेधले.
दरम्यान, मुंडेंनी पक्षातील नेत्यांना त्रास देणाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला. ते म्हणाले, कुणाला कंटाळून गणेश नाईकांनी पक्ष सोडला, निरंजन डावखरेंवर बाहेर पडण्याची वेळी कुणी आणली. तिकडे असे अनेक जण आहे. आज स्वर्गीय आर. आर. आबा असते, तर सांगलीत कुणाचा कसा त्रास आहे, हे सांगितले असते, असे म्हणत मुंडेंनी आव्हाड आणि जयंत पाटलांवरही निशाणा साधला.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.